गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणावरून सुरू असलेल्या हिंसाचारात तब्बल 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अनेक हिंदू मंदिरे, घरे पेटवून देण्यात आली. आंदोलकांकडून हिंदूंना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. त्यामुळे आता बांगलादेशातील हिंदू नागरिक हिंदुस्थानात येण्यासाठी अक्षरशः जिवाचा आकांत करत असल्याचे चित्र आहे. हिंदुस्थानात येण्याच्या उद्देशाने आज हिंदुस्थान- बांगलादेश सीमेवर असलेल्या कूचबिहार जिह्यात हजारो बांगलादेशी नागरिक एकत्र आले. त्यामुळे सीमेवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
हिंदुस्थान-बांगलादेश सीमेपासून 400 मीटर अंतरावर असलेल्या गायबांडा जिह्यातील गेंडुगुरी आणि डायखवा गावात आज सकाळपासूनच हजारो लोक एकत्र आले. हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवरील तणावाची स्थिती पाहता बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या 157 बटालियनचे जवान या भागात तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कूचबिहारमध्ये, शीतलकुचीच्या पंठाटुली गावात सेमावरील सुरक्षा पुंपणाजवळ बीएसएफचे जवान तैनात करण्यात आले असून सीमेवर सातत्याने गस्त सुरू आहे. बीएसएफचे जवान कडेकोट बंदोबस्त ठेवून आहेत.
सीमा सुरक्षेसाठी सरकारकडून समिती स्थापन
बांगलादेशातील सध्याची स्थिती पाहता हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवरील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एनडीए सरकारने एक समिती स्थापन केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. ही समिती बांगलादेशातील हिंदुस्थानी नागरिक, हिंदू आणि तेथे राहणाऱ्या इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी बांगलादेशातील त्यांच्या समकक्ष अधिकाऱयांशी समन्वय राखण्याचे काम करणार आहे.
n एडीजी, सीमा सुरक्षा दल, पूर्व कमांड यांच्या नेतृत्वाखाली सरकारने स्थापन केलेली समिती काम करणार आहे. समितीत पोलीस महानिरीक्षक. बीएसएफ प्रंटियर हेडक्वार्टर दक्षिण बंगाल, बीएसएफ प्रंटियर हेडक्वार्टर त्रिपुरा, नियोजन आणि विकास विभागाचे सदस्य, लॅण्ड पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया आणि सचिव यांचा समावेश आहे.
शेख हसीना यांना आश्रय देऊन हिंदुस्थानने चूक केली -खालिदा झिया
शेख हसीना यांच्या अवामी लीग या राजकीय पक्षाच्या कट्टर विरोधक खालिदा झिया यांचा राजकीय पक्ष बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने शेख हसीना यांना हिंदुस्थाने आश्रय दिल्यावरून नाराजी व्यक्त केली असून हिंदुस्थानने मोठी चुक केली आहे, हिंदुस्थानसाठी परिस्थिती कठीण होईल असा इशारा दिला आहे. खालिदा झिया यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते गयेश्वर रॉय यांनी इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. बांगलादेश आणि हिंदुस्थान यांच्यातील परस्पर सहकार्याचे बीएनपी पक्ष समर्थन करतो. परंतु, जर तुम्ही आमच्या शत्रूला मदत करत असाल तर या परस्पर सहकार्याचा आदर करणे कठीण होईल. तसेच शेख हसीना यांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी हिंदुस्थानने पाठिंबा दिलेला आहे. याबद्दलही चिंता वाटत असल्याचे रॉय म्हणाले.