बांगलादेशीकडे सापडला हिंदुस्थानचा पासपोर्ट, हायकोर्टाने घेतली गंभीर दखल; चौकशी करून होणार कारवाई

बांगलादेशीकडे हिंदुस्थानचा पासपोर्ट असल्याची धक्कादायक माहिती उच्च न्यायालयासमोर आली. याची गंभीर दखल न्यायालयाने घेत पोलिसांना चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

दादामियाँ खान असे या बांगलादेशीचे नाव आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याला हिंदुस्थानचा पासपोर्ट जारी झाला असावा, असे अतिरिक्त सरकारी वकील महालक्ष्मी गणपतेय यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. न्या. डॉ. नीला गोखले व न्या. फिरदोश पुन्नीवाला यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने याची नोंद करून घेत पोलिसांना चौकशी करण्यास सांगितले आहे. स्थानिक पासपोर्ट कार्यालयात पोलिसांनी याची चौकशी करावी. यात काही दोष आढळल्यास योग्य ती कारवाई करावी, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रकरण…

दादामियाँ खानच्या तीन मुलींना मानखुर्द पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाने ताब्यात घेतले. बांगलादेशी असूनही हिंदुस्थानात वास्तव्य करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मात्र आमचे आई-वडील तीन दशकांपासून हिंदुस्थानात राहत आहेत. आमच्याकडे हिंदुस्थानातील वास्तव्याचे पुरावे आहेत. त्यामुळे आम्हाला बांगलादेशात पाठवू नये. तसेच आमच्या सुटकेचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका या तीन मुलींनी केली आहे.

मुलींच्या सुटकेचे आदेश

दोन मुलींची सुटका आधीच करण्यात आली आहे. तिसऱया मुलीचीही सुटका पोलिसांनी करावी, असे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी 6 जूनपर्यंत तहकूब केली.

सीमा पार केल्याची कबुली

दादामियाँची चौकशी करण्यात आली. बांगलादेशात रोजगार नसल्याने सीमा पार करून हिंदुस्थानात आल्याची कबुली त्याने दिली. त्याची बांगलादेशात रवानगी केल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.