बँकांचे चाललंय काय! आता बँक ऑफ बडोदाचेही 5,250 कोटींचे थकीत कर्ज गायब

2508

राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकीत कर्ज घोटाळय़ांची मालिका संपता संपत नाहीय. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँकेपाठोपाठ आता बँक ऑफ बडोदाची 5,250 कोटी रुपयांची थकीत कर्जे (एनपीए) ताळेबंदातून गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे.

2019 च्या सुरुवातीला विजया बँक आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदात विलीनीकरण झाले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ बडोदाचा वार्षिक ताळेबंद तपासला. त्या तपासात बँकेच्या 2018 च्या आर्थिक वर्षातील मालमत्ता वर्गीकरणात मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाले. 31 मार्चअखेर बँक ऑफ बडोदाला 8339 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यावेळी बँकेची निव्वळ थकीत कर्जे 75,174 कोटींवर होती. बँकेने मुंबई शेअर बाजाराला ती 69,924 कोटी रुपये असल्याचे कळवले होते. म्हणजेच त्यावेळेसही एनपीएत 5,250 कोटी रुपयांचा घोळ दिसून आला.

आरबीआय आणि बँक ऑफ बडोदा यांच्यातील एनपीए अंदाजात तफावत
2018-19 या आर्थिक वर्षाचा बँक ऑफ बडोदाचा ताळेबंदही तसा घोटाळा असल्याचे मत रिझर्व्ह बँकेने मांडले आहे. या अंदाजपत्रकात बँक ऑफ बडोदाने निव्वळ थकीत कर्जाचा आकडा 23,795 कोटी दाखवला. पण आरबीआयच्या अंदाजानुसार तो 29,045 कोटी रुपये असायला हवा होता. म्हणजेच बँक ऑफ बडोदाच्या ताळेबंदावरून 5,250 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाचा उल्लेखच गायब असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकारामुळे बँक ऑफ बडोदाचे बुधवारी मुंबई शेअर बाजारातील शेअर्स 3.3 टक्क्यांनी घसरून 98.90 रुपयांवर आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या