
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाले. बारामती येथे सभेसाठी जाताना अजित पवार यांच्या विमानाला लँडिंगदरम्यान अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शोक व्यक्त केला. कमी वयात अजित पवार यांचे निधन झाल्याचे म्हणत अब्दुल्ला यांनी पवार कुटुंबियांप्रती संवदेना व्यक्त केल्या आहेत.
काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
दिल्लीतून निघण्यापूर्वी बातमी मिळाली की, बारामती येथे विमान अपघातात अजित पवार साहेबांचा मृत्यू झाला. मी मुंबईत महाविद्यालयात शिकत असल्यापासून अजित पवार साहेबांना ओळखतो आणि पवार साहेबांसोबतच रहायचो. तेव्हा अजित पवार नुकतेच शरद पवार यांच्यासोबत राजकारणात उतरले होते. तेव्हापासून त्यांनी नेहमी महाराष्ट्रातील लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. सक्षम प्रशासक आणि चांगले राजकीय नेते म्हणून अजित पवारांची ओळख होती. ते उत्तम राजकारणी होते. कमी वयात त्यांचे निधन झाले. माझ्या वतीने मी पवार साहेब, सुप्रिया सुळे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो, असे उमर अब्दुल्ला म्हणाले.
प्रत्येक विमान अपघाताचं कारण वेगळं असतं. या अपघातात काय झालं याबाबत कोणतीही टिप्पणी करू नये. चौकशी आणि तपास होऊ द्या, त्यानंतरच विमानात काही बिघाड होता की खराब हवामानामुळे अपघात झाला की आणखी काही कारण होते, हे कळू शकेल, असे अब्दुल्ला पुढे म्हणाले.




























































