Baramati Plane Crash – अजित पवार यांचे अकाली निधन हे कधीही भरून न येणारे नुकसान – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

बारामती येथे बुधवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. बारामती येथे निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी जात असताना हा विमान अपघात घडला. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.

राष्ट्रपती यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. “महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतरांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. अजित पवार यांचे अकाली निधन हे एक कधीही भरून न येणारे नुकसान आहे. महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ते नेहमीच लक्षात राहतील. मी त्यांचे कुटुंबिय, समर्थक आणि चाहत्यांप्रति माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांनाही देव हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो”, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.