
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याबाबत दोन्ही बाजूंकडून दावे-प्रतिदावे केले जात असून विलीनीकरणावरून व्हिलनीकरण सुरू आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अशी काही बैठकी किंवा चर्चा सुरू असती तर अजितदादांनी मला सांगितलं असते असे विधान केल्याने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्दय़ावरून गोंधळ अधिकच वाढला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ‘चर्चेत नव्हते त्यांना बैठकीबद्दल काय माहिती असणार?’ असा टोला फडणवीसांना लगावला आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण व्हावे ही अजित पवार यांची इच्छा होती. अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा करत होते. 12 फेब्रुवारी ही तारीख त्यासाठी निश्चित करण्यात आल्याचे शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.
जयंत पाटील यांनी कुठे, कधी आणि कशा बैठका झाल्या याबाबत माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते, मात्र अजित पवार गटातील नेत्यांनी याबाबत कधीही अजितदादांशी चर्चा झाली नसल्याचे सांगत विलीनीकरणाची चर्चा फेटाळून लावली होती. यामुळे संभ्रमाचे वातावरण असताना शरद पवार यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना चर्चेत नव्हते त्यांना विलीनीकरणाच्या बैठकीबद्दल काय माहिती असणार? असा प्रश्न करत दोन्ही एकत्रिकरणाबाबतच्या चर्चांवर शंका उपस्थित करणाऱयांना चांगलेच फटकारले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये एकत्रीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात गेली असती तर अजित पवारांनी आम्हाला सांगितले असते. अजित पवारांचा पक्ष आमच्या सरकारमध्ये आहे. त्यामुळे भाजपशी चर्चा न करता ते विलीनीकरणाचा निर्णय घेऊ शकतील का? शरद पवार आणि अजित पवार यांच्यात काय बोलणे झाले याची आम्हाला कल्पना नाही. दोघे एकत्र आले असते तर अजितदादा सरकारमधून बाहेर पडणार होते की शरद पवार गट सरकारमध्ये येणार होता? असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
सुप्रिया सुळे होणार होत्या केंद्रात मंत्री
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर शरद पवार गट महायुतीमध्ये सामील होणार होता. सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद तर राज्याच्या मंत्रिमंडळात शरद पवार गटाचा एकाला संधी असा प्रस्ताव होता. तसेच प्रदेशाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय हा शरद पवार घेणार होते असे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या बैठकीत ठरल्याची चर्चा आहे.
जयंत पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी 23 डिसेंबर रोजी एक बैठक झाली होती. त्या बैठकीला शरद पवार गटाचे 14 नेते उपस्थित होते. त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी महायुतीमध्ये सहभागी व्हायचं असं ठरलं होतं. त्याआधी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये कराडमध्ये एक बैठकही झाली होती.
अजितदादा एकटेच करत होते चर्चा
अजित पवार यांच्याकडून फक्त ते स्वतः चर्चा करत होते. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना विलीनीकरणाच्या चर्चेची माहिती झाली तर काय, असा प्रश्न शरद पवार गटाच्या नेत्यांनी विचारला. त्यावर ‘मी पक्ष चालवतोय, मी बघून घेईन’ असं खडय़ा आवाजात अजितदादांनी सुनावल्याची चर्चा आहे.































































