
टीआरपी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रँचने ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क)च्या माजी सीओओ रोमिल विनोदकुमार रामगडियाला अटक केली. रोमिलच्या अटकेने अटक आरोपीची संख्या 14 झाली आहे. तर टीआरपी प्रकरणात क्राइम ब्रँचने अंतरिम फॉरेन्सिक अहवाल ईडी आणि सीरियस फ्रॉड इन्वेस्टिगेशन विभाग (सीएफआयडी)ला सादर केला आहे.
टीआरपी केसमध्ये क्राइम ब्रँचने घनश्याम सिंगला अटक केली होती. त्याच्या चौकशीत काही नावे समोर आली. त्यानंतर आज सकाळी सीएआययूचे प्रभारी निरीक्षक सचिन वाझे यांच्या पथकातील नितीन लोंढे, बिपीन चव्हाण, आतिष लोकरे आदी अधिकाऱयांचे पथक रोमिलच्या वडाळा येथील घरी गेले. पोलिसांनी रोमिलला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पाच तास चौकशी केल्यानंतर रोमिलला अटक केली. रोमिल हे जुलै 2014 ते 31 जुलै 2020 पर्यंत बार्कमध्ये सीओओ पदावर काम करत होते. रोमिलने टीआरपी वाढवण्यासाठी मदत करणे आणि व्यूअर शिपची माहिती पुरवल्याचा पोलिसांना संशय आहे.
गेल्या वर्षी बार्कचे मॅनेजमेंट बदलण्यानंतर रोमिलला वेगळी जबाबदारी दिली होती. त्याला देशात कुठे आणि किती बॅरोमीटर लावलेले आहेत याची संपूर्ण माहिती होती. त्याने ‘रिपब्लिक टीव्ही’शी संबंधित असणाऱया सोबत व्हॉट्सअॅपवर संभाषण केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी रोमिलचा एक मोबाईल जप्त केला आहे. तो तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहे. आज दुपारी रोमिलला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची क्राइम ब्रँच कोठडी सुनावली आहे.



























































