उसतोड वाहनांसाठी बारकोडचा वापर; बीडमधील जय महेश कारखान्याचा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱ्यांचा ऊस घेऊन येणारे वाहन शिस्तीत आणि क्रमाने यावे, यासाठी येथील जय महेश कारखान्यावर ट्रॅक्टर- ट्रॉली या वाहनांना अत्याधुनिक अशी बारकोड यंत्रणा लावण्यात आली आहे. त्यामुळे ऊस घेऊन येणाऱ्या वाहनांची कोंडीची समस्या सुटली आहे. सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. राज्यात अशा यंत्रणेचा वापर करणारा बीड जिल्ह्यातील जय महेश साखर कारखाना पहिला ठरला आहे.

साखर कारखान्यावर शेतकऱ्यांच्या शेतातून ऊस आणण्यासाठी बैलगाडी व ट्रॅक्टरचा वापर सर्वात जास्त प्रमाणात होतो. मात्र, साखर कारखान्याच्या आवारात उसाचे वजनकाट्यावर वजन करण्यासाठी वाहनचालकांमध्ये चढाओढ असते. प्रत्येकजण आपल्या वाहनाचे वजन लवकर कसे होईल या प्रयत्नात असतो. तर अनेकजण कारखान्यात दिलेल्या वाहन क्रमांकाव्यतिरिक्त दुसऱ्या ट्रॅक्टरमधून लागोपाठ ऊस घेऊन येतात. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे वाहनकोंडी होते. हे टाळण्यासाठी एनएसएल ग्रुपच्या येथील जय महेश साखर कारखान्याने आता कारखान्यात येणाऱ्या 400 ट्रॅक्टर -ट्रॉली व 200 बैलगाड्या या सर्वांना बारकोड लावले आहेत.

वजन काट्यावर वाहने येतात त्यावेळी तेथील कर्मचारी वाहनावर असलेल्या बारकोडचे  स्कॅनिंग करतो व त्यानंतर आपोआपच कॉम्प्युटरमधून या वाहनाची पावती निघते. त्याचप्रमाणे ज्या भागातून शेतकऱ्यांचा ऊस निघतो या भागातील कारखान्याच्या ऑफिसमध्ये स्लीपबॉयकडून पावती घेण्याची गरज नाही. तेथील पावतीसुद्धा ऑनलाईन करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कारखाना कर्मचाऱ्यांच्या मागे लागण्याची गरज नाही. त्यांच्या मोबाईलवर पावती मिळते. ऊसाच्या वाहनाला  बारकोड लावण्याचा प्रयत्न राज्यात प्रथमच या खासगी कारखान्यावर करण्यात आला असून तो खरोखरच चांगला असून कारखाना व शेतकरी दोघांच्याही फायद्याचा असल्याचे दिसून येत आहे.

बारकोड प्रणालीमुळे ऊस वाहतुकीस शिस्त
जय महेश कारखाना शेतकर्‍यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करते. त्याचाच भाग म्हणून बारकोड यंत्रणा सुरू केली आहे. यामुळे कारखान्यांवर वजनासाठी होणारी ओढा-ताण, वाद थांबले आहेत. त्यामुळे सुरळीत गाळप होत आहे, असे जय महेश शुगर इंडिस्ट्रीजचे उपाध्यक्ष गिरीष लोखंडे यांनी सांगितले.