
आशिया कप स्पर्धेला अवघा महिनाभर बाकी असताना 14 सप्टेंबरला हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात होणाऱया महामुकाबल्यापूर्वीच वादाचे नवनवे थर रचले जात आहेत. एका बाजूला हिंदुस्थानी चाहत्यांकडून पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळू नये अशी मागणी होत असताना दुसऱया बाजूला पाकिस्तानचा माजी फलंदाज बासित अलीने थेट हिंदुस्थानलाच सामना टाळण्याची विनंती केली आहे. तुम्हीच पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नका, अशी त्याने विनवणी केलीय.
अलीने ही विनंती पाकिस्तानच्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर केली. वेस्ट इंडीजने मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 अशा फरकाने हरवले. हा 33 वर्षांनंतर वेस्ट इंडीजचा पाकिस्तानवरचा पहिला मालिका विजय ठरला आहे. बासित अलीने द गेम प्लॅन या यूटय़ूब चॅनेलवर बोलताना म्हटले, ‘‘मी प्रार्थना करतो की हिंदुस्थानने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये. जसा वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये खेळण्यास नकार दिला होता, तशीच भूमिका घ्यावी. कारण हिंदुस्थानकडून पाकिस्तानला इतका जबरदस्त मार पडेल की याची कल्पनाही करता येणार नाही.’’
हिंदुस्थानचा पाकिस्तानवर दबदबा
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हिंदुस्थानचे पारडे जड राहिले आहे. आतापर्यंत झालेल्या 13 सामन्यांपैकी 10 सामन्यांत हिंदुस्थानने पाकिस्तानला नमवले आहे. टी-20 विश्वचषक 2024मध्ये झालेल्या अखेरच्या सामन्यात पाकिस्तानला 120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अपयश आले होते व सहा धावांनी पराभव पत्करावा लागला होता. 2023मध्ये आशिया कपचे विजेतेपद हिंदुस्थाननेच पटकावले होते.
तीन वेळा आमनेसामने होण्याची शक्यता
या वर्षी आशिया कपमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान एकाच गटात असून गटपातळीवर एकदा, सुपर फोरमध्ये दुसऱयांदा आणि दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचल्यास तिसऱयांदा सामना होऊ शकतो.
बीसीसीआयकडे यजमानपद
बीसीसीआय या स्पर्धेचा यजमान आहे. मात्र हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे सामने संयुक्त अरब अमिरातीत आयोजित केले जात आहेत. दोन्ही देशांमध्ये 2027पर्यंत केवळ तटस्थ ठिकाणीच सामने खेळण्याचे मान्य झाले आहे. याच पार्श्वभूमीवर या वर्षी मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान पद पाकिस्तानकडे होते, परंतु हिंदुस्थानने सर्व सामने दुबईत खेळत विजेतेपद संपादले होते.