
अमेरिका – इराण युद्धाचा परिणाम तेल कंपन्यांपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. हिंदुस्थानातील तांदूळ मार्केटवर त्याचा परिणाम दिसून येतोय. मागील तीन दिवसांत बासमती तांदळाच्या किंमती 7 ते 10 टक्क्यांनी घसरल्या आहेत. आखाती देशांत हिंदुस्थानातून बासमती तांदूळ मोठ्या प्रमाणात निर्यात होतो. ती निर्यात आता ठप्प झाली आहे.
जगाचा मोठा व्यापार हा हिंदुस्थानातून होतो. हिंदुस्थानसह अनेक देशांना क्रूड ऑईल, गॅसचा याच मार्गाने पुरवठा होतो. हिंदुस्थान या मार्गाने आखाती देशांना तांदूळ निर्यात करतो. निर्यातदारांचे म्हणणे आहे की, सुमारे दोन लाख टन बासमती तांदूळ हिंदुस्थानी बंदरांमध्ये अडकून पडला आहे, तर सुमारे दोन लाख टन तांदूळ वाहतुकीत अडकला आहे. ऑल इंडिया राईस एक्स्पोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश गोयल यांनी सांगितले की, निर्यातदारांकडून शिपमेंट पाठविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे साधारण 4 लाख टन बासमती तांदूळ अडकला आहे.
सद्यस्थितीत वेगवेगळ्या बंदरांवर आणि समुद्रात हिंदुस्थानी बासमती तांदळाच्या कन्साईनमेंट अडकल्या आहेत. त्याची किंमत जवळपास पाच ते सहा हजार कोटी रुपये इतकी आहे. निर्यातदारांचा इतका माल अडकल्यामुळे त्यांनी नवीन कन्साईनमेंट पाठवण्यासाठीचे पॅकिंग थांबवले आहे. ज्या वेळी परिस्थिती अनुकूल होईल त्यानंतर निर्यातीचं काम पुन्हा सुरू होणार आहे.
70 टक्के निर्यात आखाती देशांत
हिंदुस्थान दरवर्षी जवळपास 60 लाख टन बासमती तांदूळ निर्यात करतो. त्यातील जवळपास 70 टक्के तांदूळ हा आखाती देशांना निर्यात केला जातो. म्हणजे दरवर्षी जवळपास 45 लाख टन बासमती तांदूळ आखाती देशांत निर्यात होतो. यातील सहा ते सात टन बासमती तांदूळ हा इराणला निर्यात होत होता. इराणला बासमती तांदळाची निर्यात रेकॉर्ड 14 लाख टन इतकी आहे.
सध्या तरी शेतकरी सुरक्षित
बासमती तांदळाच्या किमती घसरल्याचा परिणाम शेतकऱ्यांवर लगेच दिसून येणार नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी आपले पीक आधीच विकले आहे. त्यामुळे तत्काळ नुकसान व्यापारी आणि निर्यातदारांचे होईल, असा अंदाज आहे.


























































