
बॅझबॉल क्रिकेटने कंटाळवाण्या क्रिकेटला वेगवान आणि थरारक केले असले तरी काही दिग्गजांना ही शैली खटकतेय. यात ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार ग्रेग चॅपल यांचीही एण्ट्री झालीय. त्यांनी इंग्लंडच्या बॅझबॉल या आक्रमक फलंदाजीच्या शैलीवर कठोर टीका करताना सकारात्मक क्रिकेट म्हणजे बेधडक किंवा बेजबाबदार क्रिकेट नव्हे असे आसुड ओढलेत. अॅण्डरसन-तेंडुलकर मालिकेतील निर्णायक पाचव्या कसोटीत हिंदुस्थानने 6 धावांनी विजय मिळवून मालिका 2-2ने बरोबरीत आणली. शेवटच्या दिवशी इंग्लंडला केवळ 35 धावांची गरज होती, तर हिंदुस्थानला 4 विकेट्स हव्या होत्या. मोहम्मद सिराजच्या तडाखेबंद गोलंदाजीमुळे हिंदुस्थानला संस्मरणीय विजय मिळवता आला.
चॅपल यांनी लिहिलेल्या काॅलममध्ये हिंदुस्थानी युवा संघाचं कौतुक केलं असलं तरी इंग्लंडच्या खेळाडूंची, विशेषतः हॅरी ब्रूकवर चांगलेच ताशेरे ओढले. ब्रूक हा प्रतिभावान क्रिकेटपटू आहे, त्याचं टायमिंग अप्रतिम आहे आणि विविध प्रकारचे फटके मारण्याची क्षमता आहे. मात्र कसोटी क्रिकेट हे फक्त फटकेबाजीचं नाव नाही. तिथे निर्णय घेण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची असते. योग्य वेळी संयम आणि योग्य वेळी आक्रमकता यातील समतोल राखणं आवश्यक आहे.
पाचव्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने 374 धावांचा पाठलाग करताना 3 बाद 301 धावा केल्या होत्या. मात्र हॅरी ब्रूक बाद झाल्यानंतर संघाचा डाव कोसळला. यासंदर्भात चॅपल यांनी लिहिलेय की, सकारात्मक खेळाचा विचार चुकीचा नाही, पण त्याचा अर्थ ‘बेजबाबदार’ असा होत नाही. सकारात्मक क्रिकेट म्हणजे आत्मविश्वासाने खेळणं, पण त्यामध्ये धोका आणि संधी यांचं भान राखणं आवश्यक आहे.
चॅपल यांनी इंग्लंडच्या तथाकथित ‘बॅझबॉल’ शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, ही शैली अधिक विचारपूर्वक आणि खेळाच्या गरजेनुसार वापरली गेली पाहिजे, अन्यथा ती संघाच्या पराभवाचं कारण ठरू शकते.