…आणि त्याला एक संधी मिळाली! टीम इंडियामध्ये झालं पुनरागमन, आता धमाका करणार?

BCCI ने शनिवारी (24 मे 2025) इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या 18 सदस्यीय संघाची घोषणा केली. तरुण तडफदार खेळाडू शुभमन गिलच्या खांद्यावर कर्णधारपदाची आणि ऋषभ पंतच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या दोघांव्यतिरिक्त गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या आणि आयपीएलमध्ये दमदार खेळ केलेल्या करुण नायरचा संघात समावेश करण्यात आला आहे. तिहेरी शतक झळकावणारा विरेंद्र सेहवागनंतर करुण नायर हा दुसरा खेळाडू होता.

“Dear Cricket, Give me One More Chance”, असं ट्वीट करुण नायरने 10 डिसेंबर 2022 साली केलं होतं. परंतु आयपीएलच्या सुरुवातीला त्याचं हे ट्वीट पुन्हा एकदा व्हायरलं झालं आणि त्याची सर्व स्तरावर जोरदार चर्चा झाली. देशांतर्गत क्रिकेट आणि त्यानंतर आयपीएलमध्येही त्याने आपल्या खेळाची झलक दाखवली. अखेर त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. करुण नायरने 2017 साली शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाळा येथे खेळला होता. परंतु त्यानंतर मात्र, टीम इंडियाकडून त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. 2018 साली इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची संघात निवड करण्यात आली होती. परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.

India Squad For England Tour – इंग्लंड दौऱ्यात गिल कर्णधार, तर उपकर्णधारपदीही नवा खेळाडू; हिंदुस्थानचा संपूर्ण संघ जाणून घ्या…

करुण नायरने टीम इंडियासाठी आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहे. 7 डावांमध्ये त्याने आतापर्यंत 62.3 च्या सरासरीने 374 धावा केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे त्याने 2016 साली चेन्नई येथे पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तिहेरी शतक झळकावत 303 धावांची धमाकेदार खेळी केली होती. 2024-25 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने दमदार पुनरागमन करत स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्याने रणजी करंडकात 9 सामन्यांमध्ये 4 शतकं आणि 2 अर्धशतकं झळकावत 863 धावा केल्या आहेत.