
‘बीसीसीआय’ने आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील यंदाच्या हंगामादरम्यान नवा नियम लागू केला आहे. यानियमानुसार, आता बेंचवर बसलेले खेळाडू सामन्यादरम्यान मैदानावर मुक्तपणे फिरू शकणार नाहीत. टीम शीटमध्ये समाविष्ट असलेल्या 16 खेळाडूंनाच मैदानावर एण्ट्री मिळणार आहे. इतरांना आता मैदानात प्रवेश दिला जाणार नाही.
ड्रिंक्स, बॅट किंवा संदेश पोहोचवण्यासाठी फक्त संघात समाविष्ट असलेल्या 16 खेळाडूंनाच मैदानात जाण्याची परवानगी असेल. अलीकडेच संघ व्यवस्थापनाला याबाबत सूचना देण्यात आल्या असून, या निर्णयामागील अधिकृत कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. एका वेळेस बाउंड्री लाईनजवळ फक्त पाच खेळाडूंनाच उपस्थित राहता येणार आहे.
संघात 25 खेळाडू; पण मैदानावर मर्यादा
सामान्यतः आयपीएल संघात सुमारे 25 खेळाडू असतात. मात्र प्रत्येक सामन्यासाठी केवळ 16 जणांची नोंद टीम शीटमध्ये केली जाते. नव्या नियमानुसार उर्वरित खेळाडूंना डगआउटमध्येच थांबावे लागेल. त्यांना बाउंड्री लाईन आणि एलईडी बोर्डदरम्यान वावर करण्यास मनाई असेल. संघातील सूत्रांच्या मते, ‘सब्स्टिटय़ूट खेळाडूंना सामन्यादरम्यान मैदानावर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांना ड्रिंक्स नेण्याचीही परवानगी नाही.’
सब्स्टिटय़ूट खेळाडूंवरही मर्यादा
बिब्स (सब्स्टिटय़ूट जर्सी) परिधान करून मैदानाच्या कडेला वावरणाऱया खेळाडूंची संख्या पाचपेक्षा जास्त असणार नाही. हे खेळाडू साधारणतः ड्रिंक्स नेणे किंवा बाउंड्रीवरून चेंडू परत करण्याचे काम करतात. हा नियम मॅच प्लेइंग पंडिशन्स (एमपीसी)मधील कलम 11.5.2 आणि 24.1.4 अधिक कडक करतो. कलम 11.5.2 नुसार खेळाडूंना ड्रिंक्स देण्याची परवानगी ठरावीक वेळ आणि अटींनुसार असते, तर कलम 24.1.4 नुसार मैदानाबाहेर असलेल्या खेळाडूंनी ट्रेनिंग बिब परिधान करणे बंधनकारक आहे.


























































