आता खेळाडूंच्या वयचोरीला बसणार चाप, बीसीसीआयकडून उचलण्यात आले पाऊल

455
bcci-logo

क्रिकेटपटूंच्या वयचोरी प्रकरणामुळे हिंदुस्थानातील क्रिकेटला काळा डाग लागत आहे. यापुढे हिंदुस्थानातील क्रिकेट पारदर्शक, स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त असावे यासाठी बीसीसीआयने कठोर पाऊल उचलले आहे. याअंतर्गत आता वयचोरी, जन्म दाखल्याची खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या खेळाडूंना चाप बसणार आहे. बीसीसीआयने सोमवारी जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार आता वयचोरी व खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या खेळाडूंना दोन वर्षांच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेले नियम खालीलप्रमाणे
ज्या क्रिकेटपटूंनी याआधी खोटी कागदपत्रे सादर केलेली आहेत, अशा क्रिकेटपटूंनी आता त्यांच्या जन्म तारखेची खरी कागदपत्रे सादर केली तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार नाही. अशा खेळाडूंना 15 सप्टेंबरपूर्वी योग्य ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

बीसीसीआयशी रजिस्टर असलेल्या क्रिकेटपटूंनी जन्म दाखल्याशी निगडित खोटी कागदपत्रे सादर केल्यास त्यांच्यावर दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात येईल. दोन वर्षांच्या शिक्षेनंतर अशा खेळाडूंना बीसीसीआय किंवा राज्याकडून आयोजित करण्यात आलेल्या विविध वयोगटांतील स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही.

बीसीसीआयशी निगडित असलेल्या सर्व क्रिकेटपटूंना (सीनियर पुरुष व महिलांसह) आपल्या अधिवासाची (कायमचा राहण्याचा पत्ता) सविस्तर माहिती देणे आवश्यक असणार आहे. जर याबाबत खोटी माहिती सादर केली तर त्या खेळाडूला दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठावण्यात येईल. तसेच त्यांना खरी कागदपत्रे सादर करण्याची संधीही दिली जाणार नाही.

16 वर्षांखालील स्पर्धांसाठी हिंदुस्थानातील 14 ते 16 वर्षांतील खेळाडूंना रजिस्टर केले जाणार आहे. तसेच एखाद्या खेळाडूच्या जन्म दाखल्यावर त्याच्या प्रत्यक्षात जन्माच्या दोन वर्षांनंतरची तारीख असेल तर त्या खेळाडूच्या 19 वर्षांखालील स्पर्धांमध्ये खेळण्याच्या वर्षांवर मर्यादा येतील.

आपली प्रतिक्रिया द्या