
केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयकाबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सावध भूमिका घेतली. विधेयकावर कोणतीही स्पष्ट भूमिका न मांडता आधी त्या विधेयकाचा सखोल अभ्यास करू आणि त्यानंतर आपले मत व्यक्त करू, अशी टाळाटाळ करणारी भूमिका समोर आलीय.
राजीव शुक्ला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक संसदेत सादर झाले आहे. त्याचा सविस्तर अभ्यास केल्याशिवाय आम्ही कोणतीही भूमिका मांडू शकत नाही. आधी आम्ही हे विधेयक नीट समजून घेऊ, त्यानंतरच आपली अधिकृत भूमिका तुमच्यासमोर मांडू. या विधेयकात देशातील सर्व क्रीडा संघटनांमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि सुशासन सुनिश्चित करण्यासाठी विविध तरतुदी सुचवण्यात आल्या आहेत.