
आजच्या स्पर्धेच्या युगात मोबाईल अर्थात स्मार्ट फोन प्रत्येकाचीच गरज बनली आहे. मोबाईलशिवाय कोणीही व्यक्ती राहूच शकत नाही. ऑनलाईन शाळा, वर्क फ्रॉम होम, बॅंकेचे काम किंवा खरेदी असो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हल्ली स्मार्टफोन वापरणे सोयीचे झाले आहे. स्मार्टफोनमधील फीचर्समुळे प्रत्येकाची कामे सोयीची झाली आहेत. लोकांच्या अडचणी कमी होऊ लागल्या आहेत, असे असले तरीही अति मोबाईल वापरण्याचे तोटेही होऊ लागले आहेत. मोबाईलचा अति वापर आरोग्यास घातक ठरू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे पुढील शारीरिक लक्षणे दिसल्यास मोबाईल वापराबाबत सतर्क होणे आवश्यक आहे.
डोळ्यांवर ताण
सातत्याने मोबाईलमध्ये बघितल्याने डोळ्यांवर ताण येऊ शकतो. काही वेळा डोळ्यावर ताण आला आहे, हे लक्षात येत नाही. डोळे हा अतिशय संवेदनशील अवयव आहे. मोबाईलच्या निळ्या स्क्रिनमुळे डोळ्यांचे जास्त प्रमाणात नुकसान होऊ शकते. यामुलेळे डोकेदुखी, डोळेदुखी, डोळे कोरडे होणे अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे असे त्रास जाणवत असल्यास मोबाईल वापराबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
मनगट दुखणे
कोणत्याही वस्तूचा अतिजास्त वापर केल्यास नुकसान होऊ शकते. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मोबाईलचा वापर अतिजास्त प्रमाणात केल्यास मनगट दुखणे, सुन्न होणे, मुंग्या येणे अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. या त्रासांमुळे मनगटाचे गंभीर आजारपण निर्माण होण्याची शक्यता असते.
त्वचाविकार
फोनमधील हानिकारक किरणांचा प्रभाव त्वचेवर होऊ शकतो. संशोधनानुसार, मोबाईलमध्ये बॅक्टेरिया असतात, जे मोबाईलच्या अतिजास्त वापरामुळे त्वचेवर येऊ शकतात. यामुळे त्वचेवर डाग, पुरळ येऊ शकतात. काही वेळा यामुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते. यामुळे मोबाईल दररोज स्वच्छ पुसूनच त्याचा वापर करा.
झोपेची पद्धत बिघडणे
जीवनशैलीचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजेच झोप. प्रत्येक व्यक्तिने पुरेशी आणि गाढ झोप घेणे आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने झोपेची वेळ कमी होते. यामुळे सकाळी फ्रेश वाटत नाही आणि दिवसा झोप येत नाही. मोबाईल जास्त वापरल्याने कधी कधी निद्रानाश होऊ शकतो.
ताणतणावात वाढ
इंटरनेटवर काहीतरी वाचणे, फोन जास्त वेळ वापरणे, झोप न लागणे अशी तणावाची कारणे फोनमुळे निर्माण होऊ शकतात. यामुळे काही कारणांनंतर गंभीर आजार होऊ शकतात.
























































