
निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. विजयासाठी वज्रमूठ आवळा. गावाकडे जा. धनुष्यबाण घराघरामध्ये पोहचेल असे काम करा. सोंगाढोंगाची लोकं गावाकडे येतील. गळ्यात हात घालून मतदान मागतील आणि याच हाताने कधी गळा दाबतील याचा नेम नाही. त्यामुळे काळजी घ्या. गट तट बाजूला ठेवा. शिवसेनेचा विजय निश्चित आहे, असा विश्वास रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
राजुरी आणि कामखेडा या दोन पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांची बैठक वंजारवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला साक्षाळपिंप्री, बहाद्दरपूर, रूद्रापूर, अव्वलपूर, केतुरा, सोनगाव, पारगाव, शहाजानपूर, बहीरवाडी, बेलूरा, उमरद जहॉगीर, तांदळवाडी, रोहिलिंबा, लिंबारूई, मुर्शदपूर, राजुरी, तिप्पटवाडी, काटवटवाडी, वंजारवाडी येथील fिशवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जयदत्त क्षीरसागर पुढे म्हणाले, आजच्या या बैठकीला दोन पंचायत समिती गणातून मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात. ही उपस्थिती विजय निश्चित करणारी आहे. आपण वज्रमूठ आवळून कामाला लागायचं आहे. आता सर्वजण गावाकडे जात आहात. धनुष्यबाण घराघरात पोहच झाला पाहिजे. सोंगा ढोंगाची लोक गावात येतील. कुणी जातीवर तर कुणी गळ्यात हात घालून मतदान मागतील. पण गळ्यात हात घालणारे गळा दाबू नयेत याची काळजी घ्या. गट तट बाजुला ठेवा. सगळ्यांनी मनातून मदत केली तर आपला अश्वमेध कोणी रोखू शकणार नाही. सध्या शिवसेनेच्या धनुष्य बाणाला निवडून आणण्याची सामान्य लोकांत स्पर्धा सुरू आहे. वातावरण अत्यंत पोषक आहे. मतभेद बाजूला ठेवा. मी कधी कोणाची जात किंवा गट याचा विचार केला नाही. आपलेपण जपण्याची हीच खरी संधी आहे. जनतेचे मुलभूत सोडवून घेण्यासाठी आणखी एका प्रयत्नाची गरज असल्याचे जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले.
यावेळी दिलीप गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला वैजीनाथ तांदळे, अरूण डाके, विलास बडगे, नितीन धांडे, दिनकर कदम, सखाराम मस्के, जगदीश काळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात कैलास जगताप आणि निलेश जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा हृदय सत्कार क्षीरसागरांनी केला.




























































