
अमरावती जिल्ह्यातील अकोट वन्य विभागातील वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सोनाळा वरवट भागात एका अस्वलीने तिच्या पिल्लांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना ठार केले. 11 जून च्या सकाळी ही घटना घडली. अशोक मोतीराम गवते (वय५२, रा. निमखेडी) व माना बंडू गवते (वय ४२, रा. निमखेडी) अशी त्या मृत शिकाऱ्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अशोक गवते व माना गवते हे दोघेही शिकारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील खडप आणि कक्ष क्रमांक ३५७ दक्षिण आलेवाडी नियत क्षेत्रात गेले होते. त्यांच्यावर अस्वलीने हल्ला चढवून ठार केले. घटनेची माहिती नक्कल सिंग नामक व्यक्तीने दक्षिण आलेवडीचे बीटचे वनरक्षक तोटे यांना दिली असता त्यांनी दोन कर्मचाऱ्यांसह घटना स्थळ गाठून पाहणी केली. दरम्यान अशोक गवते व माना गवते दोघेही मृत झाल्याचे दिसून आले. त्यांच्या मृतदेहापासून सुमारे पंधरा ते वीस मीटर अंतरावर सुमारे सहा ते आठ महिन्यांची अस्वलाची दोन पिल्ले मृतावस्थेत होती. पिल्लांच्या अंगावर कुऱ्हाडीचे वार होते. दोन्ही शिकाऱ्यांनी अस्वलाच्या पिल्लांची शिकार केल्याने चेकाळलेल्या अस्वलीने शिकाऱ्यांना ठार केल्याचा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. घटनास्थळाची सोनाळा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी व उपवन संरक्षक ब्युला एलिल मती यांनी पाहणी करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सोनाळा पोलीस करीत आहेत.
























































