कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, बीड जिल्ह्यातील चार लाख मुलांच्या सुरक्षेसाठी आरोग्य यंत्रणा लागली कामाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर घेरल्यानंतर तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांमध्ये निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून बीड जिल्ह्यातील चार लाख मुलांच्या सुरक्षेसाठी आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. त्यांच्या उपचारासाठी विशेष कक्ष उभारले जात आहे.

तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना बसू शकतो अशी धोक्याची सूचना दिल्यानंतर राज्य सरकारच्या सुचनेनुसार बीड जिल्ह्यातील प्रशासन यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय तज्ञांची टास्क फोर्स स्थापित करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यात चार लाख लहान मुलांची संख्या आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यास मुलांमध्ये धोका निर्माण होवू नये यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबवली जात आहे. लक्षणे नसणारी आणि कमी लक्षणे असणाऱ्या लहान मुलांच्या गावागावात तपासण्या केल्या जाणार आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या उपजिल्हा रूग्णालयात त्यांच्यावर उपचारासाठी कक्ष उभारले जात आहेत. मध्यम स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या लहान मुलांसाठी जिल्हा रूग्णालयात 200 बेडचे विशेष कक्ष सुरू केले जात आहेत. तर अतिगंभीर आणि तिव्र लक्षणे असणाऱ्या लहान मुलांच्या उपचारासाठी बीडच्या जिल्हा रूग्णालयात 50 बेडचे आयसीयु आणि अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयात 50 बेडचे आयसीयु निर्माण करण्याचे काम वेगात सुरू आहे.

माझी मुले, माझी जबाबदारी

कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. मोठ्या माणसासोबतच लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे पालकांनी आता माझी मुले, माझी जबाबदारी ओळखून सजग राहणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात केवळ एक टक्का तर दुसऱ्या टप्प्यात दहा टक्के मुलांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तिसऱ्या टप्प्यात मात्र चित्र वेगळे असू शकते. वयस्कर आणि लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे सारखीच असतात. मुलांना सर्वाधिक धोका आपल्या पालकांपासून असतो. त्यामुळे पालकांनी अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे डॉ.सचिन आंधळकर, बालरोगतज्ञ यांनी ‘सामना’शी बोलताना म्हटले.

काय काळजी घ्याल

सार्वजनिक कार्यक्रम गर्दीच्या ठिकाणी मुलांना घेवून जावू नये, पालकांनी आपले लसीकरण करून घ्यावे, बाहेरून घरी गेल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवावे, मुले जास्त बाहेर जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, मुलांना योग्य आणि सकस आहार द्यावा, मुलांना लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी.