बीड जिल्ह्याला मोठा दिलासा, तिन्ही हॉस्पिटलच्या डॉक्टरसह 116 जण निगेटिव्ह

595

बीड जिल्ह्यात एका रूग्णामुळे तीन रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व उपचार घेणाऱ्या रूग्णांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. या रुग्णाच्या संपर्कातील 374 व्यक्ती शोधून काढण्यात आल्या होत्या. अखेर शुक्रवारी तिन्ही हॉस्पीटलमधील डॉक्टरसह 116 जण निगेटिव्ह आले आहेत. मुंबईहून आलेल्या एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर एका अहवालाचा निष्कर्ष निघू शकला नव्हता.

काल 118 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बीड शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णाने उपचार घेतलेल्या किंवा तपासणी केलेल्या तीन रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि उपचार घेत असलेले रूग्ण यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तब्बल 116 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मुंबईहून आलेली एक महिला बालेपीर, बीड येथे वास्तव्यास आहे. ती पॉझिटिव्ह आली आहे तर एक जणाच्या अहवालाचा निष्कर्ष निघू शकलेला नव्हता. 116 जण निगेटिव्ह आल्याने बीड शहराला मोठा दिलासा मिळाला.

हाच रूग्ण 374 जणांच्या संपर्कात आला होता. त्या सर्वांना ट्रेस करून होम क्वारंटाईन केले होते. संपर्क मोठ्या प्रमाणात आल्याने तातडीने संपूर्ण बीड शहरासह तेरा गावामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. शुक्रवारी आलेल्या निगेटिव्ह अहवालामुळे मध्यरात्री संचारबंदी उठवण्यात आली आहे. बीड शहरातील रोशनपुर, बालेपीर हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागातील बालेपीर येथील चार व्यक्ती धारूर येथील कोरोनाग्रस्त रूग्णाच्या संपर्कात आल्याचे आढळून आले आहे म्हणून त्या भागात पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केले.

पुन्हा 38 जणांचे स्वॅब तपासणीसाठी
शनिवारी सकाळी अजून 38 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता बीड जिल्ह्यात एकुण 55 रूग्ण आहेत. त्यातील 50 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील 4 जण अतिजोखमीचे रूग्ण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या