बीडसह पाच शहरांमध्ये 10 दिवसासाठी ‘लॉकडाऊन’, जिल्हा प्रशासनाचा आदेश

1276

बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आदेश जारी केला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून 21 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत बीड शहरासह पाच शहरे कडेकोट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी अखेर प्रशासनाला ठोस पाऊले उचलावी लागली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी दुपारी एक आदेश पारित केला आहे. त्या आदेशानुसार 11 तारखेच्या मध्यरात्रीपासून 21 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी आणि केज, हे पाच शहरे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. पाच शहरातील व्यक्तींना तातडीच्या वैद्यकीय गरजे व्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबीसाठी घराबाहेर जाता येणार नाही. तसेच दहा दिवसाच्या लॉकडाऊननंतर लगेच गर्दी होवू  नये यासाठी विविध प्रकारची दुकाने वेगवेगळ्या दिनांकास सुरू करण्याची परवानगी दिली जाईल.

आता यापुढे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट येवूनही कोणतेही लक्षणे नसणाऱ्या रूग्णांना वैद्यकीय तपासणी करून अटी आणि शर्थी लागू करत त्यांच्या घरीच विलगीकरण व्यवस्था केली जाईल त्यासाठी त्या रूग्णाला शपथपत्र सादर करावे लागेल. या दहा दिवसामध्ये बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी आणि केज शहरामध्ये घरपोहच दूध विक्रीचा कालावधी सकाळी नऊ वाजल्यापासून असेल, खाजगी व शासकीय रूगणालये आणि केवळ रूग्णालयाशी संलग्न असलेल्या औषधी दुकाने  सुरू राहतील. घरगुती गॅस सिलेंडर सेवा सुरू राहिल. मोबाईल कंपनी ऑपरेटरांना पास काढावे लागेल. ज्या दुकानदारांची 8 आणि 9 ऑगस्टला आरोग्य तपासणी झाली आहे, रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत त्यांनी 10 तारखेला दुकान उघडण्यास हरकत नाही असे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या