
कोरोनाच्या संकटात मदतीचा हात देण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. बीड जिल्ह्यातील पुणे, मुंबई, ठाणे परिसरात अडकून पडलेल्या हजारो कामगारांना दिलासा देण्याचे काम शिवसेनेने केले. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ज्या भागात बीड जिल्ह्यातील नागरिक अडकून पडले आहेत, त्या भागातील कंपनी मालकांना विनंती करून त्यांच्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवला तर गरज भासल्यास बीड जिल्ह्यात त्यांच्या असणाऱ्या शाळा महाविद्यालये वसतिगृह इतर विविध संस्थेच्या इमारती कामगारांच्या निवाऱ्यासाठी देण्याचे कलेक्टर राहुल रेखावार यांना मान्य केले.
कोरोनाचे संकट ओढवल्याने बीड जिल्ह्यातील पुणे, मुंबई, ठाणे परिसरातील कामगारांचे मोठे हाल होत आहेत. तर जवळपास 50 हजार ऊस तोड कामगार राज्यभर अडकून पडले आहेत. त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. मुंबई ठाणे पुणे येथे काम करणाऱ्या बीड जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी गेल्या दोन दिवसात शिवसेनेच्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याशी संपर्क करून आपली परिस्थिती विशद केली. या गंभीर परिस्थितीमध्ये शिवसेनेने मदतीचा आधार दिला. अन्न धान्य संपलेल्या या हजारो लोकांच्या अन्नधान्याची व्यवस्था लावली.
ज्या भागात हे कामगार आहेत, त्याच भागातील आपल्या ओळखीच्या विविध कंपनी मालकांना या कामगारांना तातडीने अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची विनंती केली. बहुतांश भागात ही सुविधा उपलब्ध ही झाली. तसेच बीड जिल्ह्यात दाखल झालेल्या हजारो कामगारांना घरा पासून दूर ठेवले जात आहे. त्यांना राहण्यासाठी त्याच्या निवाऱ्या साठी जयदत्त क्षीरसागर यांच्या असंख्य संस्थेच्या इमारती दिमतीला असणार आहेत. सैनिक विद्यालय, फूड कॉलेज, मेडिकल कॉलेजसह गाव पातळीवरील शाळेच्या, महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारती जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्याची तयारी दर्शवली. यामुळे कामगारांचे हाल वाचणार आहेत.




























































