बीड – निवडणूक स्कँडल, तपास एसीबीकडे जाण्याची शक्यता

868

बीड येथे निवडणूक प्रक्रियेमध्ये आलेला भरमसाठ निधी खिशात घालण्यासाठी अवास्तव खर्च दाखवून वाटमारी करणाऱ्या अधिकाऱ्याची पळता भुई थोडी झाली आहे. सोमवारी आयुक्तांचे पथक बीडमध्ये धडकले सर्व दस्तावेज ताब्यात घेतले. झाडाझडती सुरू केली. गैरकारभार अन झालेली हेराफेरी बघून पथक अक्षरशः थक्क झाले आहे. या प्रकरणाचा तपास लाच लुचपत विभागाकडे जाण्याची शक्यता एका उच्च अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

बीड लोकसभा अन विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक प्रक्रिया साठी आलेला निधी खर्च करायचा आहे. कोणाचेही नियंत्रण नसणार हे हेरून निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या मर्जीतील ठेकेदार गाठून प्रत्येक खरेदीत अन व्यवस्थेत अवास्तव बिले जोडून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधी लुटण्याचे काम केले. या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर निवडणूक सचिवांच्या आदेशाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाच जणांची समिती स्थापन केली. या पथकामध्ये मराठवाड्यातील उच्च अधिकाऱ्याचा समावेश केला. हे पथक चौकशी साठी येणार समजताच घोटाळेबाज अधिकाऱ्याला घाम फुटला. त्यांनी केलेली सारवासारव वाया गेली.

आयुक्तांचे पाच जणांचे पथक सोमवारी बीडमध्ये धडकले. त्यांनी सोमवारी आधी सर्व दस्तावेज अन महत्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतली. दुपारनंतर झाडाझडतीला सुरुवात केली, या पथकाने घोटाळ्याची पाळेमुळे शोधण्यास सुरुवात केली. दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयाचा पारा वाढलेला होता. कागदपत्रातील नोंदी अन कोटीच्या कोटी आकड्यांची उड्डाणे बघून उच्चस्तरीय पथक थक्क झाले आहे. बीड निवडणुकीतील घोटाळ्याची पारदर्शक चौकशी केली जात आहे. दोन दिवसात हा तपास लाचलुचपत विभागाकडे जाऊ शकतो असा अंदाज एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

घोटाळा बघून खिन्न अधिकारी माघारी
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या पाच जणांच्या पथकामधील एक सदस्य जालण्याचे रोहयो उपजिल्हाधिकारी रविंद्र परळीकर हताश अन् खिन्न होऊन या पथकातून बाहेर पडले आहेत. त्यांच्या जागी आता वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. रविंद्र परळीकर या आधी बीडमध्ये निवासी उप जिल्हाधिकारी या पदावर होते. म्हणूनच त्यांनी या पथकातून माघार घेतली, परळीकर एक प्रामाणिक अन शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात.

आपली प्रतिक्रिया द्या