
बीड जिल्ह्यात गुरूवारी रात्री उशिरापर्यंत पावसाने धुवाँधार बॅटींग केली. जिल्हाभरात 35.90 च्या सरासरीने पाऊस झाला. जोरदार पावसामुळे बीड जिल्ह्यातील तलावामध्ये पाण्याची आवक झपाट्याने वाढत आहे. वडवणी तालुक्यातील उर्ध्व कुंडलिका प्रकल्प खचाखच भरला आहे. कुंडलिका नदी दुथडी भरून वाहत आहे. बीड जिल्ह्यातील सहा मंडळामध्ये गुरूवारी रात्री अतिवृष्टी झाली आहे. आतापर्यंत 628 वार्षिक सरासरी असणाऱ्या बीड जिल्ह्यात 390 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत 61.04 टक्के पाऊस झाला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये गुरूवारी रात्री उशिरापर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्रीतून जिल्हाभरात ३५.३० मि.मी.च्या सरासरीने पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस आष्टी तालुक्यामध्ये झाला. आष्टी तालुक्यात 65 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. तर बीड 43.90, पाटोदा 39.50, गेवराई 39, शिरूर 53.50, वडवणी 24, अंबाजोगाई 9.40, माजलगाव 20, केज 39, धारूर 40, परळी 14.40 मि.मी.पाऊस झाला आहे. सहा मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात नेकनूर 71, आष्टी 76, दौलावडगाव 73, धानोरा107, ततरवणी 90, धारूर 87 मि.मी.पाऊस झाला आहे. पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. लहान प्रकल्पाला भरती लागली आहे. मोठ्या प्रकल्पामध्ये पाण्याची आवक आता वाढत आहे. वडवणी तालुक्यातील उर्ध्व कुंडलिका प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. रात्री उशिरा या प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले. कुंडलिका नदी दुथडी भरून वाहत आहे. त्याचा फायदा माजलगावच्या मोठ्या प्रकल्पाला होणार आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात आतापर्यंत 61.04 टक्के एवढा पाऊस झाला आहे. गुरूवारी रात्री जिल्हाभरात 35.30 मि.मी.च्या सरासरीने पाऊस झाला आहे. आतापर्यंत एकुण 390 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.


























































