
बीड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली असून वडवणी तालुक्यातील कुप्पा येथे शेतात गेलेला तरुण कुंडलिका नदीत वाहून गेला. अक्षय बाबासाहेब जाधव (वय – 28) असे या तरुणाचे नाव असून पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत वाहून गेला. गेल्या 18 तासापासून त्याचा शोध सुरू आहे.
कुप्पा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या इंदिरानगर, बाराभाई तांडासह दोन तांडे आहेत. येथील लोकसंख्या 2 हजार असून कुप्पा गावात येण्याकरीता या परिसरातील लोकांना दररोज कुंडलिका नदी ओलांडूनच शेतामध्ये जावे लागते. कुंडलिका नदीवर पूल नसल्याने पुराच्या पाण्यातून येथील शेतकर्यांना रस्ता काढावा लागतो. मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदी दुथडी भरून वाहत असून शेतातून घराकडे परतत असताना अक्षय बाबासाहेब पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांनी शोधकार्य चालू ठेवले परंतू तो आढळून आला नाही. यासंदर्भात माहिती मिळतात आमदार प्रकाश सोळंके, जयसिंग सोळंके यांनी आपत्ती विभागाशी संपर्क साधात यंत्रणा हलवली. बचाव पथकासह ग्रामस्थ शोध कार्यासाठी परिश्रम घेत आहेत. गेल्या 18 तासापासून त्याचा शोध सुरू असून अद्याप हाती काहीही लागलेले नाही.
दरम्यान, आठ किलोमीटर लांबून वळसा घालून गावाकडे येण्यापेक्षा शेतकरी सतत पुराच्या पाण्यातूनच रस्ता काढतात. त्याकरीता इंदिरानगरकडे जाण्यासाठी तात्काळ पूल उभारावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.