दोन महिन्यात बीड शहरातील रस्ते होणार चकाचक, नगराध्यक्षांनी पाहणी करून अधिकार्‍यांना धरले फैलावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड शहरात भुयारी गटार योजनेतून सुरू असलेले काम ऐन पावसाळयाच्या तोंडावर सुरू झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या कामाबरोबरच शहरातील 16 डिपी रस्त्यांचे कामही सुरू करण्यात आले. ही कामे काही दिवसांपासून ठप्प होती. बुधवारी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पाहणी करून पाईपलाईनसह जी रस्त्याची कामे हाती घेतली आहेत, ती दोन महिन्यात पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या असून संबंधित अधिकार्‍यांनी दोन महिन्यात रस्त्याची कामे पूर्ण होतील असे सांगितले.

बीड शहरातील 16 डिपी रस्त्यांची कामे मंजूर झाली असून त्यापैकी 8 रस्त्यांची कामे सुरू आहेत. यापैकी 3 रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे 5 महिन्यांत पूर्ण होणार आहेत. शहरातील मुख्य मार्गावरील रस्त्यांची कामे दोन महिन्यात पूर्णच झाली पाहिजेत, असा आग्रह धरून संबंधित अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणाबद्दल नगराध्यक्षांनी अधिकार्‍यांना चांगलेच झापले आहे.

माने कॉम्प्लेक्स, इमामपूर रोड, मोमीनपूरा, शहेंशाहवली दर्गा रोड, वृंदावन गार्डन या भागात अधिकार्‍यांसह जाऊन नगराध्यक्षांनी पाहणी केली. यावेळी न.से. विनोद मुळूक, भिमराव वाघचौरे, बिभीषण लांडगे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता बडे, चक्के, मुख्याधिकारी रोहिदास ढोरकुलकर, इंजिनियर पाटील, सानप, राख, आसिफ, टाळके, ढवळे, लाला बन्सोडे, सय्यद, यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.