उपचार केलेल्या गरूडाला मुक्त करून वृक्ष संमेलनाचा समारोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जगातील पहिल्या वृक्ष संमेलनाचा समारोप शुक्रवारी सायंकाळी सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्याहस्ते करण्यात आला. उपचार करून बऱ्या झालेल्या गरूडाला मुक्त करून या संमेलनाचा समारोप करण्यात आला. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अनोख्या पध्दतीने वृक्ष संमेलनाचा समारोप करण्यात आला. जगातील पहिल्या वृक्ष सुंदरीचा किताब क्रांती रामहारी बांगर हिने पटकावला. तिचा चांदीचा मुकूट देत सयाजी शिंदे यांनी तिचा गौरव केला.

दोन दिवसांपासून पालवन येथील सह्याद्री देवराई प्रकल्प येथे अनोखे असे वृक्ष संमेलन सुरू होते. संमेलनाच्या दुसर्‍या दिवसाची सुरूवात (शुक्रवारी) शैलेंद्र निसर्गंध यांच्या ओसाड माळरानी फुलली ही देवराई या भारदस्त आवाजातील गीताने झाली. यानंतर श्रीकांत इंगळहडीकर यांनी दुर्मिळ वनस्पती या विषयावरील परिसंवादात वनस्पतींवर निसर्गाचा समतोल अवलंबून असून दुर्मिळ होत असलेल्या वनस्पती जपल्या पाहिजेत असे सांगितले. झाड केवळ सावली, फळे आणि ऑक्सीजनच देत नाही तर आपल्याला महित नसलेल्या बर्‍याच काही गोष्टीही देते यामुळे वृक्ष लागवड आणि संवर्धन महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. यानंतर पोपट रसाळ यांनी वृक्ष बँक या विषयावर आपले विचार व्यक्त करताना बँकेत आपन 10 रूपये ठेवले तर त्याचे पन्नास वर्षांनी 60 रूपये होतील मात्र त्याच दहा रूपयाचे एक झाड लावले तर ते झाड मोठे झाल्यानंतर रोज 22 किलो ऑक्सीजन आपल्याला देते. रोज अनेक किलो कार्बनडायऑक्साईड शोषून घेऊन शुध्द ऑक्सीजन देते. यामुळे वृक्ष बँका ह्याच शास्वत बँका असल्याचे ते म्हणाले. यानंतर जसिंग पवार यांनी आपले विचार व्यक्त केले. सुनंदाताई पवार यांनी वंशाचा दिवा मुलीही होऊ शकतात असे सांगत मुलींना जपा, शिकवा आणि भरारी घेण्यासाठी मोकळे आकाश द्या, असे विचार व्यक्त केले. यानंतर सयाजी शिंदे यांच्या हस्ते सह्याद्री देवराईसाठी योगदान देणार्‍या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सायंकाळी 05:30 वाजता शिंदे यांनी उपचार केलेल्या गरूडाला मुक्त करून वृक्ष संमेलनाचा अनोख्या पध्दतीने समारोप केला. या गररूडावर सर्पराज्ञी प्रकल्प येथे मागील सहा महिन्यांपासून उपचार सुरू होते. यावेळी लेखक अरविंद जगताप, संतोष सोहणी, शिवराम घोडके यांच्यासह हजारोंच्या संख्येने पर्यावरणप्रेमी नागरीक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

क्रांती बांगरने पटकावला वृक्ष सुंदरीचा पहिला किताब
जगातील पहिल्या वृक्ष संमेलनात विश्‍व सुंदरीच्या धर्तीवर वृक्ष सुंदरी ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 25 महाविद्यालयातील 105 युवतींनी सहभाग नोंदवला होता. यातून विविध स्पर्धात्मक चाचण्यांतून 11 वृक्ष सुंदरी निवडण्यात आल्या होत्या. यातून शुक्रवारी पुन्हा स्पर्धात्मक चाचण्या घेऊन क्रांती रामहारी बांगर (आयटीआय, बीड), ज्ञानेश्‍वरी इनामदार (केएसके), रविना सवई (बीड) या तिघींची निवड करण्यात आली. शेवटी यातून क्रांती रामहारी बांगर हिने जगातील पहिल्या वृक्ष सुंदरीचा किताब पटाकावला. सयाजी शिंदे यांच्या हस्ते चांदीचा मुकूट परिधान करून क्रांती बांगर हिचा गौरव करण्यात आला.