
यावर्षी मान्सून चार दिवस आधीच दस्तक देणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आगोठची बेगमी करण्याकरिता रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मासळी बाजारांमध्ये अक्षरशः जत्रा भरल्याचे पाहायला मिळत आहे. सुकट, मांदेली, बोंबील घेण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. मच्छी विक्रेत्या महिलादेखील ये दादा.. ये मावशे आवर ये.. सुका ताजा सस्ता म्हावरा घे.. असा आवाज देताना दिसत आहेत. खरेदीचा हा हंगाम साधारण अजून 10 दिवस राहणार असून मासळी बाजारात कोट्यवधींची उलाढाल होणार आहे.
पावसाळ्यात दरवर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत खोल समुद्रातील मासेमारीला बंदी असते. नदी तसेच खाडीमधील मासे पावसाळ्यात विक्रीसाठी येत असले तरी त्याचे दर आवाक्याबाहेर असतात. त्यामुळे एप्रिल महिना उजाडला की महिला आपापल्या अंगणांमध्ये पापड, सुके मसाले, गहू, तांदूळ, गावठी कडधान्यांची बेगमी घरांमध्ये करून ठेवतात. त्याचबरोबर सुकट, बोंबील, वाकट्या, खारवलेला बांगडा, करदी याची खरेदी करतात. रायगड जिल्ह्यातील पोयनाड, पेजारी यासह ठिकठिकाणच्या मासळी बाजारांमध्ये सुकी मच्छी घेण्यासाठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दर वाढले, पण फिकीर कशाला !
मत्स्य दुष्काळाचा फटका यावर्षी सुक्या मासळीलादेखील बसला आहे. आवक कमी होत असल्याने सुक्या मच्छीचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत 100 ते 200 रुपयांनी वाढले आहेत. सोड्यांचे दर तर दीड ते दोन हजारांच्या घरात पोहोचले आहेत. मात्र दर वाढले असले तरी खवय्यांना फिकीर नसून सुकी मासळी खरेदी करण्यासाठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
- पावसाळ्यात चढणीच्या माशांनादेखील अधिक मागणी असते, परंतु सर्वसामान्य खवय्यांच्या खिशाला हे परवडत नसल्याने त्यांना तीन महिने सुक्या मासळीवरच ताव मारावा लागतो.
भाव प्रतिकिलो
अंबाडी सुकट 700-800
जवळा 300-350
बोंबील 700-750
सोडे 1800-2000
बगी 300-500
मांदेली 200