
सामना प्रतिनिधी। कुडाळ
कुडाळ शहरात बेकरी फोडून चोरट्यांनी गल्ल्यातील चिल्लर व चॉकलेटच्या बरण्या लंपास केल्या आहेत. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. पावशी येथे आठवड्याभरापूर्वी बॅंकेवर चोरट्यांनी दरोडा टाकत पंधरा हजार रुपयाचा ऐवज लुटला होता. ही घटना ताजी असतानाच कुडाळ शहरात चोरट्यांनी बेकरी लुटल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
कुडाळ शहरात वर्दळीच्या ठिकाणी असलेली बेकरी चोरट्यांनी रविवारी रात्री टार्गेट केली. बेकरीचे शटर उघडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत चिल्लरवर डल्ला मारला. तसेच चॉकलेटच्या बरण्याही पळवल्या. मात्र सुदैवाने मोठी रक्कम चोरट्यांच्या हाती लागली नाही. सोमवारी सकाळी मालकाने बेकरी उघडल्यावर चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात माहीती दिली.
.
आठवडाभरापूर्वीच पावशी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅकेवर दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना घडली होती. यात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे पंधरा लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या दरोड्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दरोडेखोर मोकाटच आहेत. या दरोड्याच्या तपासासाठी कुडाळ पोलिसांनी रायगड पासून बेळगाव पर्यंत पोलिस पथके पाठविली. अन्य भागातही पोलिस दरोडेखोरांच्या मागावर आहेत. त्यातच पुन्हा कुडाळात चोरट्यांनी बेकरी लक्ष केल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
























































