बेलपत्र मधुमेहावर गुणकारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बेलपत्रांमध्ये अॅण्टी-डायबेटिक गुणधर्म मुबलक असतात. म्हणून ही पाने म्हणजे मधुमेह्यांना वरदानच… बेलाच्या पानांमध्ये शुगर आणि कॉलेस्टेरॉल कमी करण्याचे गुणधर्म आहेत.

– मधुमेहाचा विकार असेल तर बेलपत्रांचा १० ग्रॅम रस दररोज सकाळच्या वेळी प्यायल्यास फायदा दिसून येईल.

– बेलफळातील बी कुटून घेऊन त्यात कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचा रस घालून हे मिश्रण थोडे थोडे घेत राहिल्यासही मधुमेहावर आराम पडतो.

– बेलाची १५ ते २० कोवळी पाने पाण्याने साफ करून घ्यायची. नंतर ती कुटून त्यात थोडे पाणी घाला. त्यातील थोडे मिश्रण दिवसातून दोन-तीनदा घेतल्यास रक्तातील शुगर नियंत्रित राहते.

– बेलाच्या पानांचा रस आणि कारल्याचा रस एकत्र करून प्यायल्यानेही मधुमेहातील शर्करेवर नियंत्रण ठेवता येते.

– बेलाच्या पानांचा १० ग्रॅम रस घेऊन त्यात मेथीच्या दाण्यांचे ५ ग्रॅम चूर्ण मिसळून सेवन केल्यास मधुमेह्यांना भरपूर फायदा होतो.

– बेलाची फळं सावलीत सुकवून ती कुटून घ्यायची. त्या चूर्णात जांभळ्याच्या बियांचे चूर्ण सम प्रमाणात घाला. या मिश्रणातील ५-५ ग्रॅम चूर्ण दररोज सकाळ आणि संध्याकाळी पाण्यासोबत घेतल्यास मधुमेहातील शुगरवर नियंत्रण ठेवता येते.

– बेलाची पानं उकळवून घेतल्यावर गाळून राहिलेले पाणी नियमित थोडे थोडे प्यायल्यास मधुमेहावर गुण येतो.