
पंजाब नॅशनल बँकेला सुमारे १३ हजार कोटी रुपयांना चुना लावून देशाबाहेर पळालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला हिंदुस्थानात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बेल्जियम येथील न्यायालयाने चोक्सीचे हिंदुस्थानकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली. तसेच बेल्जियम पोलिसांनी त्याची केलेली अटकही वैध ठरविली आहे.
मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी या दोघांनी पंजाब नॅशनल बँकेची १३ हजार कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बँक अधिकाऱ्यांना हाताशी धरून दोघांनी हा घोटाळा केला आणि देशाबाहेर पळून गेले. ११ एप्रिल रोजी बेल्जियमच्या अँटवर्प शहरातील पोलिसांनी चोक्सीला अटक केली होती. तो चार महिन्यांपासून तुरुंगात आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) चोक्सीच्या प्रत्यार्पणाची विनंती बेल्जियम सरकारकडे केली होती.
शुक्रवारी अँटवर्प न्यायालयाने चोक्सीची अटक वैध ठरविली. तसेच हिंदुस्थानने केलेली प्रत्यार्पणाची मागणीही वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.