
स्टीवन स्मिथचा राजस्थान रॉयल्सचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करतोय. राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवणारी बातमी समोर आली आहे. अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यूएईला रवाना झाला असून सात दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीनंतर तो राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करू शकणार आहे.
वडिलांच्या आजारपणामुळे इंग्लंडच्या बेन स्टोक्सला पाकिस्तान व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले होते. त्यानंतर तो थेट न्यूझीलंडला रवाना झाला होता. ख्राईस्टचर्च येथे वडिलांवर उपचार सुरू होते. त्यांच्यासोबत काही दिवस राहिल्यानंतर बेन स्टोक्स पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनाकडून बेन स्टोक्सच्या पुनरागमनाची बातमी देण्यात आली आहे.
12.5 कोटींचा करार
राजस्थान रॉयल्सच्या फ्रेंचायझीकडून लिलावात बेन स्टोक्सवर 12.5 कोटींची बोली लावण्यात आली होती, मात्र या मोसमातील सुरूवातीच्या लढतींना तो मुकला आहे. बेन स्टोक्स रविवारी यूएईत पोहोचणार असला तरी सात दिवसांच्या विलगीकरणानंतरच तो संघाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात 11 ऑक्टोबरला होणाऱया सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत त्याला राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करता येणार आहे.


























































