
बिहारमध्ये मतदार फेरपडताळणी (SIR) प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याच दरम्यान पश्चिम बंगालमध्येही लवकरच SIR संदर्भात पावले उचलली जातील असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, बंगालमध्ये SIR होण्याची शक्यता सध्या दिसत नाहीये. सूत्रांच्या माहितीनुसार, बंगाल सरकारने शुक्रवारी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून ही माहिती दिली आहे. त्या पत्रात बंगालचे मुख्य सचिव मनोज पंत यांनी म्हटले आहे की राज्य सध्या SIR साठी तयार नाही आणि अशा प्रकारे मतदार फेरपडताळणी करता येणार नाही. यासाठी किमान दोन वर्षे लागतील.
अलीकडेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून बंगाल SIR साठी तयार असल्याचे सांगितले होते, पण आता बंगाल सरकारने हे पत्र फेटाळून लावले आहे. मुख्य सचिवांनी घाईघाईने आयोगाच्या CEO कार्यालयाला पत्र पाठवून राज्याची भूमिका स्पष्ट केली. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्य सचिव पंत यांनी पाठवलेल्या पत्रात नाराजीही व्यक्त केली आहे. राज्याशी सल्लामसलत न करता CEO कार्यालयाने आयोगाला पत्र का पाठवले असा सवालही विचारला गेला.
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते अरूप चक्रवर्ती यांनी दावा केला, SIR सोबत एक तमाशा सुरू आहे. राहुल गांधींनी माहिती गोळा करून मतांची चोरी उघड केली आहे. निवडणूक आयोगाने आधी त्यांना उत्तर द्यायला हवं. SIR संदर्भात आयोग आणि विरोधकांमध्ये संघर्ष वाढतच चालला आहे. हा संघर्ष बिहारमध्ये SIR चा टप्पा पूर्ण झाल्यानंतर काही वेळातच सुरू झाला होता.