बंगळुरूत काँग्रेस आमदाराच्या घरावर संतप्त जमावाचा हल्ला, पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू

1519

कर्नाटकातील बंगळुरू शहरात मंगळवारी रात्री भयंकर हिंसाचार झाला. इथले काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर संतप्त जमावाने हल्ला केला. या जमावाने मूर्ती यांच्या घरात घुसून तोडफोड केली, गाडया पेटवून दिल्या. यानंतर या संपूर्ण परिसरात या जमावाने अशरक्ष: धुडगूस घालत जाळपोळ आणि हिंसाचाराला सुरुवात केली.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोहोचलेल्या पोलिसांवरही जमावाने दगडफेक केली आणि त्यांच्या गाड्यांना आग लावली. या हिंसाचारामध्ये बंगळुरूचे अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह 60 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

police-car-bengaluru-violen

मूर्ती यांच्या पुतण्याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे हा जमाव बिथरला होता. या जमावाने मूर्ती यांच्या घराकडे धाव घेत हिंसाचाराला सुरूवात केली. शहरातील डीजे हळ्ळी आणि केजीहळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा हिंसाचार भडकला होता. रात्री 9.30 च्या सुमारास या हिंसाचाराला सुरूवात झाली होती.

पोलिसांनी हिंसाचार आटोक्यात येत नसल्याने गोळीबार करण्याची परवानगी मागितली होती. मध्यरात्रीनंतर त्यांना ही परवानगी मिळाली होती. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला, ज्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. जवळपास पहाटे 2 च्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी या हिंसाचाराप्रकरणी 110 जणांना अटक केली आहे.

या हिंसाचारानंतर डीजेहळ्ळी आणि केजी हळ्ळी भागात कर्फ्यू लागू केला आहे. मूर्ती यांच्या पुतण्याच्या ज्या पोस्टमुळे हा सगळा हिंसाचार भडकला होता त्याने ती नंतर डिलीटही केली होती. मात्र तोपर्यंत त्या पोस्टमधला मजकूर सगळीकडे व्हायरल झाला होता. दंगेखोरांनी आमदाराच्या घरावर हल्ला केल्यानंतर त्या परिसरातील 30 गाड्या पेटवून दिल्या होत्या. त्यांनी आमदाराच्या घरालाही आग लागली होती. पोलिसांनी दंगेखोरांना शांत करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते ऐकायला तयार नव्हते त्यांनी पोलिसांवरच दगडफेकीला सुरूवात केली. ज्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. पोलिसांनी पहाटे 3 वाजता हिंसाचार भडकलेल्या भागांमध्ये कर्फ्यू लावला आणि वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या मूर्ती यांच्या पुतण्याला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या