बेस्टच्या वातानुकूलित ए-2 बस मार्गात बदल, बॅकबे ते वांद्रे वसाहत नवा मार्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट उपक्रमात नव्याने दाखल झालेल्या ‘वेट लिज’वरील वातानुकूलित बसेसच्या मार्गात काही बदल केले आहेत. ए-87 क्रमांकाचा बॅकबे आगार ते वांद्रे वसाहत हा नवीन वातानुकूलित बस मार्ग सुरू झाला आहे. या ए-87 क्रमांकाच्या मार्गावरील बस मंत्रालय, चर्चगेट, वरळी, माहीममार्गे चालवली जात आहे. या मार्गावर केवळ सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळीच फेऱया चालवण्यात येत आहेत. त्या जोडीलाच ए-2 या सीएसएमटी आणि धारावीपर्यंत जाणाऱया एसी बसचा मार्ग आता फ्री-वेवरून जाणार आहे.

बेस्टने वातानुकूलित बस फेऱयांत वाढ केली आहे. ही नवीन सेवा ए-87 बस बॅकबे आणि वांद्रे वसाहतीपर्यंत चालवली जात आहे. ही बससेवा सोमवार ते शनिवारपर्यंत चालवली जाणार आहे. स. 7.15 वाजता या मार्गावरील पहिली बस ही वांद्रय़ाहून रवाना केली जाईल, तर ए-2 ही बस यापूर्वी जे. जे. उड्डाणपुलावरून चालवण्यात येत होती, पण आता ही बस शुक्रवारपासून सीएसएमटीहून पी. डि’मेलो मार्ग, कर्नाक बंदर, वाडीबंदर, फ्री वे, देवनार आगार, सुमननगर, राणी लक्ष्मीबाई चौक मार्गावरून चालवली जात आहे.  ए-87 ही चर्चगेट ते वर्ल्ड ट्रेड सेंटर तर ए-2 ही सीएसएमटी ते एनसीपीएपर्यंत नेण्यात येत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत कमी अंतरावरील प्रवाशांना त्याचा फायदा होत आहे.