
अदिती सारंगधर,[email protected]
वळचणीच्या जागी, अडचणीच्या जागी साप निघणं एक सामान्य गोष्ट… आणि त्याला मारून टाकणं ही माणसाची हिंसक वृत्ती… पण आपल्यातलेच काही संवेदनक्षम हात या निष्पाप जीवांना वाचवण्याचा प्रयत्न करतात… सर्पमित्र श्याम जोशी यापैकीच एक…
‘अगं, माझ्या स्वप्नात साप आला होता. साप होता की नाग होता ते कळलंच नाही. बहुतेक घोणस होती’’, ‘‘ई… गं… गाडीखाली आला साप’’, ‘‘अगं, आमच्या घराच्या बाजूला निघाला ना साप… अजगर होता बहुतेक’’, ‘‘तो सापवाला… म्हणजे साप पकडणारा आला आणि घेऊन गेला…’’, ‘‘अगं, मुलं खेळतात ना बाहेर, पकडून चावायचा… मारूनच टाकलं त्यापेक्षा…’’ अशी आणि अशा प्रकारची शेकडो संभाषणं ऐकली आहेत आपण यापूर्वी. साप या प्राण्याविषयी नेहमीच एक उत्सुकता आणि ओढ राहिली आहे. सुदैवानं आज या सदराच्या निमित्ताने त्या ओढीचं रूपांतर समाधानात झालं, जेव्हा श्याम जोशी सरांशी बोलले.
अंहं… डोकं खाजवू नका. इंटरनेटवर सर्च करू नका. उगाच टीव्ही चॅनल बदलत बसू नका. श्याम सर आहेत हाडाचे शिक्षक. प्राणिप्रेमी आणि सच्चे सर्पमित्र. नागपुरातले. अनेक वर्षे वन विभागाचं त्या क्षेत्रातलं एक महत्त्वाचं डिपार्टमेंट सांभाळलं आणि स्वतःची अशी सर्परक्षक संस्था स्थापन केली. ‘कोब्रा अडवेंचर’ आणि ‘नेचर क्लब’ या संस्थांमध्ये अनेक प्राणिप्रेमी आहेत. प्राणी (सर्प) जिवंत पकडण्यासाठीची सगळी उपकरणं आणि प्राथमिक उपचार आहेत. पुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता स्वेच्छेनं कितीही मैलांवर प्रवास करायला तयार असणारे आणि सरकारच्या नियमाला धरून वागणारे स्वयंसेवक आहेत. ‘‘सॉरी, मॅडम… आपण काल फोन केलात, पण मी फोन घरी विसरलो होतो. एका ठिकाणी लेक्चर होतं. मुलांसाठी… नेचर आणि मी या विषयावर…’’ इतकं अदबीने बोलणारा साधा, सरळ माणूस श्याम जोशी सर…
‘‘खरं तर साप या विषयीचं आकर्षण अगदी लहानपणापासूनच होतं. आमच्या इथे सतत साप पकडायचो. बाजूला अक गृहस्थ राहायचे. ते साप पकडून मारायचे. लहानपणी कुठे साप सापडला… घरात, कोणाच्या आवारात, बाथरूममध्ये, तर त्या काकांना बोलवायचे. काका त्या सापाला पकडून मारायचे. त्यांचं खूप कौतुक व्हायचं. हारतुऱयांनी सत्कार व्हायचा. लोक अगदी आदरानं वागायचे त्यांच्याशी. एकदा मी बाहेर उभा असताना त्यांना बोलावणं आलं. काका साप आलाय. त्यांच्या सोबत मीही गेलो. साप अगदी अडगळीच्या खोलीत होता. मी काकांना म्हटलं, ‘‘मारू नका ना त्याला. तो बिचारा बसलाय गप्प. भीती वाटली असेल त्याला. थंडी वाजली असेल, पण काकांनी तो साप काढला. सुंदर, काळाभोर, खवले असलेला साप आणि समोर मारून टाकलं. माझं बालमन खूप दुखावलं, रडू आलं, पण काकांचा मात्र उदो उदो झाला. त्या दिवशी मनापासून वाटलं, सापाला पकडायला शिकायचं. अर्थात तेव्हा काही ठरवण्याइतका मोठा नव्हतो. सापाला जिवंत पकडायचं आणि त्याच्या घराच्या दिशेनं जंगलात सोडून द्यायचं. मग हळूहळू साप पकडायचं तंत्र आत्मसात केलं. घराच्या मागची पडकी खोली बनली माझी छुपी प्रयोगशाळा. आकडा, बारीक सळी, पिशवी, बाटली घेऊनच बाहेर पडायचो. हळूहळू अभ्यासातलं लक्ष उडायला लागलं आणि माकाडाच आमच्यावरचं, पण साप पकडून आणायचो. मागे बरण्यांमध्ये ठेवायचो आणि त्यांच्याविषयी माहिती काढायचो.
पुस्तक आणलं, वाचून काढलं. त्याची अक्षरशः पारायणं करत राहिलो. अगदी आजपर्यंत. इतकं की, आज बायको चिडवत म्हणते, ‘अहो, बरेच दिवस तुम्ही ते पुस्तक नाही उघडलंत. बरेच म्हणजे 10 दिवस तरी झाले असतील ना!’ पण जेव्हा साप पकडून ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे कळलं तेव्हा ते सगळे साप सोडून दिले, पण प्रत्येक सापाच्या गुणधर्मानुसार त्याची वेगळी जागा (क्षेत्रफळ) असते याची तेव्हा कल्पना नव्हती. तोपर्यंत वाया गेलेल्या माझी रवानगी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये झाली होती. मुंबईत अनेक संस्थांची प्रत्यक्ष ओळख झाली, एक्सपोजर मिळालं आणि परत गेल्यावर ठरवलं, आपली संस्था स्थापन करायची. आज संस्थेने 4500 वर जिवंत साप पकडले आहेत आणि त्यांना योग्य ठिकाणी सोडून दिलंय.
मी लेक्चर्सना जातो तेव्हा नेहमी सांगतो, मुलांची (लहान) पिढी ही निसर्गापासून तुटत चाललीये. खरं तर मुलांनी निसर्गाच्या एनर्जीशी एकरूप होऊन उद्धीत झाले पाहिजे. अशा वेळी एक लहानपणीचा किस्सा आठवला. आम्ही मित्र अंगणात खेळत होतो. पावसाळी मोसम होता आणि अंधार पडायला लागला होता. समोरचा मित्र अचानक स्तब्ध झाल्यासारखा उभा राहिला. ‘श्याम, पायात साप आहे.’ बघितलं तर दोन पायांच्या मध्ये वेटोळे घालून बसला होता. बांबूने हळूच बाजूला केला. पोत्यात भरला आणि रानात सोडला.
अगदी गेल्याच आठवडय़ात अत्यंत निरुपद्रवी असा मखमली, वेल्वेट, सुंदर नक्षीकाम असणारा अप्रतिम ट्रिंकेड जातीचा साप पकडला, ज्याची खूप तस्करी होते. खूप सुंदर आहे गं सापांचं विश्व… आणि मी गेली 42 ते 43 वर्षे छान रमलोय त्यांच्यात. इतका की, एकदा तर घरच्यांनी अल्टिमेटम दिला होता. झालं असं की, नुकताच रेस्क्यू करून घरात आणून ठेवलेला अजगर होता. वन विभागाला कळवून ठेवलं होतं, पण ते येईपर्यंत त्याला घरीच ठेवायचं होतं. त्याच दरम्यान बाजूच्या घरात लग्न होतं. सगळी मंडळी गप्पा मारायला जमली. सर्पांचा विषय, माझ्या कथा, माहिती सुरू झाली. बाहेरून आलेल्या मंडळींना साप बघायची उत्सुकता. म्हटलं आहे अजगर. बिनविषारी होता. तसं बाहेर काढलं आणि समोर बसलेल्या सगळ्यांना माहिती सांगायला लागलो. इतक्यात त्या अजगराने विष्ठा केली. ती विष्ठा दिसते एखाद्या जखमेसारखी. समोर बसलेले सगळे, विशेषतः मुलं पॅनिक होऊन जखम जखम म्हणून ओरडायला लागली. मी बघायला गेलो तर त्याने उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा पकडला. 60 ते 70 सुया टोचल्यासारखं झालं. मी शांत होतो, पण बाकीचेच हडबडले होते. हो, हळूहळू पकड घेऊन वरवर चढायला लागला. बरं, मदतीला कोणाला बोलावणार. माझी कातडी निघाल्याचं लक्षात आलं. शक्ती लावून डाव्या हाताने त्याचं तोंड पिशवीत टाकलं आणि बंद केला, पण माझ्या हातात त्याचे दोन दात रुतले होते. सुई उकळून घेतली आणि काढले. प्रचंड वेदना झाल्या. डॉक्टरचे सोपस्कार झाले, पण त्यानंतर अख्खं घर विरुद्ध मी अशी टीम पडली. माझं सर्पमित्र असणं वगैरे बंद करा म्हणाले. कसंबसं समजावलं त्यांना.
आणखी एक गमतीशीर किस्सा. मी लेक्चर देऊन नुकताच आलो. बाहेर उभा होतो. अचानक ‘जोशी सर, जोशी सर’ करत लोक उभे. त्यांच्या मागे महामंडळाची बस होती रिकामी. ‘काय झालं?’ तर म्हणाले ‘बाबूलगाव गावातल्या विहिरीची मोटर नादुरुस्त झाली होती. तिच्या दुरुस्तीसाठी माणसं उतरली तर कोब्राने फणा बाहेर काढला. मोटरवर बसलाय ऐटीत.’ मी साप काढायला गेलो. उतरलो. खेचावा तर खाली पडेल. उचकला तर फणा मारेल. हातात बांबूची काठी आणि आकडा घेतला. बाहेरून एकाने पोतं धरलं. आयत्या वेळी काय मिळेल, तर जवळच्या एका कांदेबटाटेवाल्याचं पोतं आणलं. त्यात तो सहा ते साडेसहा फुटांचा कोब्रा भरला, पण तोपर्यंत लोकांना ताटकळत ठेवून घाईने आलेली बस गेली. हात दाखवत एक गाडी थांबवली. निघालो. गाडीतल्या पिशवीत सतत काहीतरी हलतंय बघून घाबरून ड्रायव्हरने विचारलं ‘काय आहे?’ चारवेळा टाळल्यानंतर पाचव्यांदा सांगितलं, ‘कोब्रा आहे.’ कचकन ब्रेक मारून म्हणाला, ‘त्याला सोडा नाहीतर तुम्ही उतरा.’ शेवटी जवळच्या जंगलाकडे सोडलं त्याला, तर साप जाईचना. वळून फिरून आमच्याकडेच यायला लागला. शेवटी आत जाऊन सोडून आलो.
अनेक प्रसंग आहेत. जिवावर बेतलेले, जिवानिशी सापाला वाचवलेले, पण कधीच एकाही सापाला मारलं नाहीये. कधीच. वेगवेगळ्या प्रजातीचे साप वेगवेगळ्या भागात आढळतात. यवतमाळमध्ये कोब्रा, नानोटीचं प्रमाण जास्त आहे. इतक्या सापांना हाताळलं आहे. प्रत्येकाचा स्पर्श वेगळा. या विश्वाची सफर करायची असेल तर तुझ्या आर्टिकलचे 500 ते 700 शब्द नाही पुरायचे. इथं या… गावातल्या मातीत… प्रत्यक्ष भेटा त्यांना… मग भीतीची जागा फक्त प्रेम घेईल… आणि प्रेमाने त्यांना हाताळलंत की, तो स्पर्श त्या जीवालाही जाणवेलच की… शेवटी इतपंच म्हणेन… निसर्गाशी एकरूप होऊया रे… त्याला फक्त तुमच्या गरजेपुरतं वापरलंत तर तो कधी आपली साथ सोडून देईल ना, कळणार नाही!’’






















































