‘बेस्ट’ प्रवाशांचा आता ‘लक्झरी’ प्रवास, आठवडाभरात 4 बस दाखल होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बेस्ट’ प्रवास करणाऱया प्रवाशांना आता लक्झरी प्रवास करता येणार आहे. कारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात चार प्रीमियम बस ‘बेस्ट’मध्ये दाखल होणार आहेत. ‘आरटीओ’च्या परवानगीनंतर या बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. त्यामुळे बेस्ट प्रवाशांचे लक्झरी बसने प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे घरातून मोबाईल अॅपवर तिकीट बुकिंग केल्यावर संबंधित प्रवाशांची सीट्स आरक्षित करता येणार आहेत.

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱया बेस्ट उपक्रमाने वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसचा समावेश केला आहे. यामध्ये एकूण दोन हजार लक्झरी बस दाखल होणार असून त्यापैकी चार बस 8 ते 10 दिवसांत बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. वाहतूक पोलिसांची परवानगी घेण्याबाबत प्रक्रिया सुरू असून लवकरच प्रवाशांना लक्झरी प्रवास करता येईल, असे ‘बेस्ट’ प्रशासनाने सांगितले. या बसेसचे आरक्षण अॅपवर करता येणार असून बस कुठपर्यंत आली, बसमध्ये किती गर्दी आहे याची सविस्तर माहिती अॅपवर मिळणार आहे.

अशा सुविधा, हा मार्ग….
सीएसएमटी, नरीमन पॉइंट, ठाणे, मीरा रोड, बीकेसी, पवई, लोअर परळ आदी बस मार्गांवर प्रीमियम बस सेवा उपलब्ध असेल. या प्रीमियम बसचे तिकीट सर्वसाधारण व वातानुकूलित बसेसपेक्षा अधिक असेल. मात्र ओला, उबेरपेक्षा स्वस्त प्रवास करता येणार आहे. या बसमध्ये सुरक्षेसाठी सीसीटीव्ही पॅमेरे, पुश बॅक सीट्स, सीट्ससमोर लॅपटॉप ठेवण्यासाठी जागा, वातानुकूलित यंत्रणा अशा सुविधा असतील.