बेस्टचे प्रवासी वाढले, तोटय़ात मात्र वाढ सुरूच

1395

बेस्टचे शेअर ऑटो रिक्षा-टॅक्सीने पळवलेले प्रवासी पुन्हा मिळवण्यासाठी बेस्टचे किमान तिकीट पाच रुपये करण्याच्या निर्णयानंतर बेस्टला प्रवाशांची हळूहळू पसंती मिळत आहे. बेस्टच्या बसेसला गर्दी होत असून तिकिटांचे दर कमी केल्याने बेस्टच्या गंगाजळीला दररोज 50 लाखांचा फटका बसत आहे. म्हणजे दर महिन्याला बेस्टला 13 कोटींचा तोटा होत आहे.

बेस्टच्या तिकिटांपेक्षा शेअर टॅक्सीत तीन ते चार जण बसून जाणे पसंत करणाऱ्या मुंबईकरांना बेस्टने जुलैपासून सुखद धक्का दिला. सर्वत्र महागाईचे वातावरण असताना बेस्टने पाच रुपयांत जवळचा प्रवास आणि सहा रुपयांत वातानुकूलित प्रवास घडवण्याचा निर्णय घेतल्याने बेस्टकडे प्रवाशांनी पुन्हा रांगा लावल्या. मुंबई पालिकेने आर्थिक निधी देत बेस्टला तोटय़ातून बाहेर काढण्याचा निर्णय घेत घसघशीत अनुदान मंजूर केले.

बेस्टच्या ताफ्यात 3 हजार बसेस असून आणखी सात हजार खासगी बसेस खरेदी करण्याच्या प्रमुख शिफारशींसह मेट्रो स्थानकांना जोडणारे मार्ग ‘फिडररूट’ सुरू करा, जागांचा खासगी विकास करा, असे उत्पन्न वाढवण्याचे अनेक मार्ग बेस्टला अनुदान देताना पालिकेने सुचवले आहेत. त्या वेळी बेस्टने गमावलेले प्रवासी पुन्हा मिळवण्यासाठी तिकीट दर कमी करण्याची महत्त्वाची शिफारस पालिकेने केली होती. या तिकीट दर घटवण्याच्या निर्णयाचा परिपाक म्हणून बेस्ट प्रवाशांच्या संख्येत वाढ होत गेली आहे.

2005पूर्वी रोजची प्रवासी संख्या 45 लाख

एकीकडे प्रवाशांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असताना बेस्टच्या कमाईत मात्र घट झाली आहे. 2004मध्ये बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या सुमारे 45 लाखांवर होती आणि रेल्वेनंतर बेस्ट मुंबईची लाईफलाईन मानली जात होती. नंतरच्या काळात ही संख्या अनेक कारणांनी रोडावत गेली. ही बेस्टची प्रवासी संख्या 19 ते 20 लाखांपर्यंत कमी झाली. त्यानंतर बेस्ट कामगारांचे पगार काढण्यासाठीही पालिकेकडे हात पसरायची वेळ बेस्टवर आली.

दररोज 28 लाख 60 हजारांवर प्रवासी

आर्थिक मदतीचा ‘बुस्टर डोस’ मिळाल्यानंतर बेस्टने पुन्हा आपल्या फेऱ्या सुरू करीत नवीन गाडय़ा खरेदी केल्या. सध्या बेस्टच्या बसमधून दररोज 28 लाख  60 हजारांवर प्रवासी ये-जा करीत आहेत. मात्र बेस्टची प्रवासी जरी वाढत असले तरी  उत्पन्नाला भाडे कपातीने कात्री लागल्याने पूर्वी दरदिवशी 2 कोटी 30 लाख रुपयांपर्यंतचे मिळणारे उत्पन्न आता 1 कोटी 80 लाखांपर्यंत कमी झाला आहे. म्हणजेच उत्पन्नात 50 लाखांची घट झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या