`राजगृहा’जवळील बेस्ट बसस्टॉप हटवला, शिवसेनेच्या मागणीनंतर तातडीने कार्यवाही

280

‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाची तोडफोड केल्याचे समोर आल्यानंतर या ठिकाणी असणारा बेस्ट बसस्टॉप हटवण्यात आला आहे. या बेस्टस्टॉपचा आधार घेऊन काही समाजकंटक अनुचित प्रकार करीत असल्याची शक्यता असल्यामुळे हा स्टॉप तातडीने हटवावा अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी महाव्यवस्थापकांकडे केली होती.

जाधव यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याशीही चर्चा केली. या पाश्र्वभूमीवर आज हा बसस्टॉप हटवण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह दादर हिंदू कॉलनी येथे आहे. त्या राजगृहाच्या मुख्य गेटला लागूनच बेस्ट बस स्टॉप आहे.

नासधूसप्रकरणी एकाला अटक
‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिंदू कॉलनी येथील ‘राजगृह’ या निवासस्थानावर दगडफेक व धुडगुस घातल्या प्रकरणी पोलिसांनी आज उमेश सीताराम जाधव (३५) याला अटक केली. त्याने असे कृत्य का केले, या घटनेमागे कोणाचे षड्यंत्र आहे का याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. बंगल्याच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माटूंगा पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि एका संशयिताला बुधवारी ताब्यात घेतले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपीसोबत आणखी एक तरुण दिसत होता. पोलिसांनी आज उमेश जाधवला अटक केली. उमेश परळ टीटी येथे राहत असून बिगारीकाम करतो.

आपली प्रतिक्रिया द्या