बेस्टचा बोनस नेमका केव्हा? आता मंगळवारच्या बैठकीकडे लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
best-bus

सर्वत्र दिवाळी आनंदात साजरी होत असताना बेस्टच्या बोनसचा गुंता अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे बेस्टच्या सुमारे 32 हजार कामगारांचे डोळे आता मंगळवारच्या बेस्ट समितीच्या बैठकीकडे लागले आहेत. मात्र, या बैठकीत बोनसचा निर्णय जाहीर जरी झाला तरीही यंदाची दिवाळी देखील बोनसविना संपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांना बोनस मिळाला असताना बेस्ट कामगारांना नेमका बोनस कधी मिळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणूक आचारसंहिता रविवारी संपुष्टात आल्यानंतर बोनसचा निर्णय जाहीर होणार असल्याचे सांगितले जाणार होते. सुधारीत वेतन करार झाल्यानंतर बेस्ट प्रशासनाने वेतन करारावर स्वाक्षरी न करणाऱया कामगारांना बोनस न देण्याचा निर्णय घेतला होता. या भूमिकेस विरोध दर्शवत कामगार संघटनांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तिथे कामगारांच्या बाजूने निर्णय लागल्याने त्यांचा हुरूप वाढला होता. या सर्व घडामोडी होत असताना बोनस दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरही हाती न आल्याने आता मंगळवारच्या समिती बैठकीकडे लक्ष लागले आहे.

मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमास 1,800 कोटी रुपयांपेक्षा अधिक सबसिडी दिली आहे. त्या निधीच्या बळावर बेस्टने जुनी देणी फेडली आहेत. बेस्टची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारत असताना बेस्ट कामगारांना प्रशासनाने 9,100 रु. बोनस जाहीर केला आहे. दिवाळीपूर्वी तरी बोनस पदरात पडेल या आशेत बेस्टचे हजारो कामगार होते पण आचारसंहितेमुळे बोनसचा विषय आता बेस्ट समिती बैठकीपर्यंत लांबला आहे.