
बेस्ट उपक्रमातील महिला आणि पुरुष (पत्नी हयात नसलेले) कर्मचाऱयांनाही आता त्यांच्या अपंग, विकलांग अपत्याकरिता काही अटी आणि शर्तीवर 180 दिवसांची बालसंगोपन रजा लागू करण्याच्या निर्णयाला बेस्ट समितीच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली आहे. राज्य शासनाने याआधीच हा निर्णय आपल्या कर्मचाऱयांना लागू केला होता. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांनाही हा निर्णय लागू झाला होता. आज अखेर बेस्ट कमिटीमध्ये हा निर्णय मंजूर करण्यात आला.
महाराष्ट्र शासन, वित्त विभाग यांच्या दि. 23.07.2018 चा शासननिर्णय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या दि. 03.08.19 च्या विभागीय परिपत्रकानुसार काही अटी आणि शर्तीनुसार 180 दिवसांची कमाल बाल संगोपन रजा लागू करण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमातील सेवक वर्ग सदस्य, महिला आणि पत्नी नसलेले पुरुष सेवक तसेच ज्या पुरुष कर्मचाऱयाची पत्नी अंथरुणाला खिळली आहे त्यांना विविध अटीवर ही बाल संगोपन रजा लागू होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. मुलांचे वय 18 होईपर्यंत ही रजा लागू राहणार आहे. एका वर्षात दोन महिन्यांच्या कमाल मर्यादेपर्यंत ही रजा घेता येईल. ही रजा एका कॅलेंडर वर्षात तीन टप्प्यांतही घेता येईल. ही योजना पहिल्या दोन मुलांकरिता लागू राहील. बेस्टमध्ये एक वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर ही रजा लागू राहील. बाल संगोपन रजेकरिता अर्ज करण्यासाठी विकलांगबाबतचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेनेच रजेचा लाभ घेता येणार आहे.
























































