
सामना ऑनलाईन, मुंबई
‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज रविवारीही कोणताच तोडगा निघाला नसल्याने मुंबईकरांचे सलग सहाव्या दिवशी प्रचंड हाल झाले. यातच रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे सहकुटुंब घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांची चांगलीच लटकंती झाली. दरम्यान, उद्या सोमवारी उच्च न्यायालयाने नेमलेली उच्चस्तरीय समिती न्यायालयात आपली बाजू मांडणार असल्याने उद्या तरी संपावर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘बेस्ट’ कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. प्रशासनासोबत झालेल्या चर्चांमध्येही कोणताही तोडगा निघाला नाही. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीसोबतची पहिली बैठकही निष्फळ ठरल्याने सहाव्या दिवशीही संप सुरूच राहिला. यातच रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने कोणतीच चर्चा झाली नसल्याने उद्या सोमवारी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इलेक्ट्रिक कामगारांचा नैतिक पाठिंबा
‘बेस्ट’ कामगारांच्या संपाला इलेक्ट्रिक विभागातील कर्मचाऱ्यांचा नैतिक पाठिंबा असल्याचे इलेक्ट्रिक कामगारांचे म्हणणे आहे. इलेक्ट्रिक कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्याबाबत संजय घाडीगावकर हे चुकीची माहिती पसरवत असल्याचेही कामगार सांगत आहेत.
सुमारे 18 कोटींचे नुकसान
आधीच तोटय़ात चाललेल्या ‘बेस्ट’चा संप सलग सहाव्या दिवशीही सुरू राहिल्यामुळे सुमारे 18 कोटींचे नुकसान झाले आहे. दरवर्षी 800 ते एक हजार कोटींचा तोटा असलेल्या ‘बेस्ट’ला या दीर्घ संपामुळे मोठा फटका बसणार आहे. संपामुळे ‘बेस्ट’चे दररोज तीन कोटींचे उत्पन्न बुडत आहे.
आजच्या बैठकीकडे लक्ष
संपाबाबत निर्णय घेण्यासाठी कोर्टाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीसोबत कृती समितीची दुसरी बैठकही उद्या सोमवारी होणार आहे. या वेळी कर्मचाऱ्यांच्या मागणीपत्रा संदर्भात चर्चा होणार आहे.






























































