
सामना प्रतिनिधी । मुंबई
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कामगार संघटना, मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन आणि बेस्ट कामगार क्रांती संघ या संघटनांच्या नेतृत्वाखाली बेस्ट कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. बेस्टचे महाव्यवस्थापक व पालिका आयुक्त यांच्या मनमानी कारभाराला मुख्यमंत्र्यांचाच पाठिंबा आहे, असा आरोप बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी यावेळी केला.
बेस्टमधील ढासळती आर्थिक स्थिती, प्रशासनाचे आडमुठे धोरण, बेस्ट महाव्यवस्थापक व पालिका आयुक्त यांच्या मनमानी कारभाराविरोधात बेस्ट कर्मचाऱयांनी पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढला. बेस्टचा आणि पालिकेचा अर्थसंकल्प एकत्र करण्याबाबतचा ठराव बेस्ट समितीने मंजूर केला. तो स्थायी समितीमध्येदेखील मंजूर झाला. त्याला आता आठ महिने झाले. मात्र अजूनही पालिका आयुक्तांनी महाराष्ट्र सरकारकडे पाठवलेला नाही. ठराव पाठवला नाही की पाठवू नका असे कोणी सांगितले का हे आम्हाला कळायला हवे. जोपर्यंत हे आम्हाला कळत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आम्ही आयुक्तांना आणि महाव्यवस्थापकांना खुर्चीवर बसू देणार नाही, असे सामंत यांनी सांगितले.
बेस्टच्या कामगारांना पदाप्रमाणे काम दिले जात नाही त्यामुळे कामगारांची कार्यक्षमता ढासळली आहे. गेल्या दोन वर्षांकरिताचे सर्व कामगार-कर्मचारी-अधिकाऱ्यांचे रजेचे रोखीत रूपांतर, रजा प्रवास भत्ता महाव्यवस्थापकांनी रोखून धरला आहे, असा आरोपही सामंत यांनी यावेळी केला.



























































