
बेस्टने ऐतिहासिक दर कपात लागू केल्यानंतर किमान तिकीट पाच रुपये झाल्याने बेस्टच्या प्रवाशांची संख्या 32 लाखांपर्यंत पोहोचली; परंतु यामुळे बेस्टला नव्याच समस्येला सामोरे जावे लागले असून ती म्हणजे सुट्ट्या पैशांचा खच बेस्टच्या तिजोरीत पडत आहे! या सुट्ट्या नाण्यांचे करायचे काय? या विवंचनेत असलेल्या बेस्ट उपक्रमाने आता दुकानदारांना, व्यापार्यांना, टोलनाक्यांना बेस्टकडील चिल्लर देण्याचा निर्णय घेतला आहे.
बेस्टने तिकीट दर कमी केल्यानंतर अवघ्या पाच रुपयात पाच किलोमीटरपर्यंतचा प्रवास करायला मिळत असल्याने बेस्टच्या कंडक्टरकडे सुट्टी नाणी मोठय़ा प्रमाणात जमा होत आहेत. दर दिवशी 11 ते 12 लाखांची नाणी जमा होत असल्याने एवढय़ा सुट्ट्या नाण्यांचे करायचे काय असा प्रश्न बेस्टला पडला होता. त्यावर उपाय म्हणून ही नाणी आता नागरिकांना, दुकानदारांना टोलनाकेवाल्यांना देण्यात येणार आहेत.
सर्व आगारांत सुट्टी नाणी मिळणार!
बेस्टकडे सध्या 5 रुपये, 10 रुपये, 2 रुपये व 1 रुपया मूल्यांची नाणी. तसेच 10 रुपये व 20 रुपये मूल्यांच्या नोटांचे प्रमाण मुबलक झाले असल्याने नागरिकांना नोटांच्या बदल्यात ही सुट्टी नाणी हवी असल्यास बेस्ट उपक्रमाच्या सर्व आगारांतील तिकीट व रोख विभागात (रविवार आणि सुट्टीचा दिवस वगळून) सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 या वेळेत नोटांच्या बदल्यात सुट्टी नाणी वितरीत केली जाणार आहेत.
रिडलर ऍपवर बेस्टचे तिकीट व पास खरेदी करा!
बेस्टचे प्रवासी व कंडक्टर यांच्यात सुट्ट्या पैशांवरून होणारे वादविवाद टाळण्यासाठी आता ‘रिडलर’ ऍपवरून मोबाईलवरूनही बेस्टचे तिकीट व पास काढण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. या ऍपवरून बसची तिकीटे खरेदी करता येणार आहे. शिवाय मासिक, त्रैमासिक बसपासचे नूतनीकरण देखील करता येणार आहे. त्याचप्रमाणे ई-वॉलेटचा वापर करून मोबाईलवरून बस पासचे नुतनीकरण करता येणार आहेत.


























































