मुंबईकरांना लुटण्याचा डाव उधळला,‘अदानी’चे स्मार्ट वीज मीटर बसवण्यास ‘बेस्ट’ची स्थगिती

शिवसेनेच्या जोरदार पाठपुराव्यामुळे अखेर ‘बेस्ट’ प्रशासन नरमले असून ‘अदानी’चे स्मार्ट वीज मीटर बसवण्यास स्थगिती देत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याबाबत ‘बेस्ट’च्या वीज विभागाकडून लेखी हमीचे पत्रच माजी आमदार दगडू सकपाळ यांना देण्यात आले आहे. ‘अदानी’चे अन्यायकारक स्मार्ट मीटर बसवू नयेत यासाठी आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करीत ‘बेस्ट’वर धडकही देण्यात आली होती. अखेर मुंबईकरांना लुटण्याचा डाव शिवसेनेने उधळून लावत वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

केंदीय  विद्युत मीटर स्थापना आणि प्रचालन दुरुस्ती अधिनियमानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या मीटरचे अद्ययावतीकरण करण्यासाठी स्मार्ट मीटर बसवण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यानुसार प्रीपेड पद्धतीमध्ये कार्यरत असलेल्या स्मार्ट मीटरमधून वीज पुरवठा करण्यात येणार होता. स्मार्ट मीटरशिवाय कोणतेही वीज कनेक्शन देण्यात येणार नाही, असे मीटर स्मार्ट प्रीपेमेंट असतील असे जाहीर करण्यात आले होते. यामुळे ग्राहकांना अद्ययावत सुविधा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता.

असा होता स्मार्ट मीटरचा फटका

स्मार्ट मीटरमुळे नाहक आर्थिक भुर्दंड पडत असल्यामुळे वीज ग्राहकांचा याला विरोध होता. नवीन मीटरमुळे वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलाला सामोरे जावे लागत होते. नव्या मीटरमुळे बेस्टचे मीटर वाचक, वीज वितरण कर्मचारी आणि रोख भरणा करणारे असे विविध खात्यातील कर्मचारी बेरोजगार होणार आहेत.

शिवसेनेचा दणका

बेस्ट’ने ग्राहकांना स्मार्ट मीटर देण्यास सुरुवात केली होती. 11 लाख वीज ग्राहकांपैकी तीन लाख ग्राहकांना नवीन स्मार्ट मीटर बसवण्यातही आले होते. मात्र शिवसेनेच्या आंदोलनानंतर बेस्टच्या विद्युत विभागाने दिलेल्या लेखी उत्तरानुसार स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामास स्थगिती देत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.