
सामना प्रतिनिधी । मुंबई
बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करण्यासह संपूर्ण भाडे टप्प्यात फेररचना करण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीने शुक्रवारी फेरविचारासाठी पाठवला आहे. यामुळे मुंबईकरांचे बस भाडे कमी करण्याचा निर्णय तूर्त लांबणीवर गेला आहे.
बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करण्यासह भाडे टप्प्याची फेररचना करण्यासह अनेक बदल सुचविणारा प्रस्ताव बेस्ट समितीपुढे शुक्रवारी विचारासाठी आला होता. बेस्ट तिकीट दराची फेररचना करण्यासह बेस्टच्या उत्पन्नवाढीच्या निर्णयाचा प्रस्ताव पालिका स्थायी समितीने मंजूर करून बेस्ट समितीकडे मंजुरीकरिता पाठवला होता. बेस्टने जवळच्या अंतराचे तिकिटाचे दर जरी कमी केले असले तरी तीन महिन्यांत अतिरिक्त सात हजार बसेस समाविष्ट करा अन्यथा उर्वरित अनुदान मिळणार नाही, असे पालिकेने म्हटले आहे. या नमूद बस येण्याआधीच तिकीट दर कमी करून जर नव्या बसेसचा समावेश नसताना फेर्या वाढणार कशा, असा सवाल सदस्य सुनील गणाचार्य यांनी या वेळी करीत प्रस्तावास विरोध केला.
तिकीट दर कमी केल्याने सध्या दररोज 20 लाख प्रवाशी वाढतील असा प्रशासनाचा दावा आहे. मात्र वेट लिजवरील सात हजार बसेस तीन महिन्यांत खरेदी कशा करणार? बेस्टकडे केवळ 26 डेपो आहेत. आजपर्यंतच्या इतिहासात चार हजाराच्या वर बसेसची एकूण संख्या गेलेली नाही. तर इतक्या बसेस ठेवणार कुठे… जर प्रवाशी वाढणार असतील तर त्यांना बसेस तर उपलब्ध व्हायला हव्यात! सध्या केवळ 2900 बसेस प्रत्यक्ष रस्त्यावर धावत असून कर्मचारी भरती बंद आहे. त्यामुळे हा भाडे फेररचनेचा प्रस्ताव घाईघाईत मंजूर करण्यापेक्षा पटलावर सगळी माहिती ठेवा, अशी मागणी गणाचार्य यांनी केली. त्यास सदस्य भूषण पाटील व इतर सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे बेस्टचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी बेस्टच्या भाडे फेररचनेचा हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठविण्यास मंजुरी देत सदस्यांची वेगळी बैठक घेण्याची मागणीही मान्य केली.
बेस्टच्या ताफ्यात ‘तेजस्विनी’! गर्दीच्या वेळी धावणार 37 महिला स्पेशल
बेस्टच्या ताफ्यात लवकरच मुंबईच्या गर्दीत महिलांसाठी फायद्याच्या ठरणार्या स्पेशल मिडी बसेसचा समावेश होणार आहे. या बसेस खास महिलांसाठी राखीव असणार असून त्यांना ‘तेजस्विनी’ असे नाव देण्यात येणार आहे. अशा 37 बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीसमोर आला आहे.
एकीकडे बेस्टच्या ताफ्यात छोटय़ा आकाराच्या बसेसचा समावेश करण्याचे धोरण असताना आता महिलांसाठी स्पेशल अशा 37 नॉन एसी डिझेलवर धावणार्या मिडी बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीसमोर आला आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘तेजस्विनी’ बस योजनेनुसार मुंबई शहरात गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांच्या फायद्यासाठी अशा मिडी बसेस चालविण्याची योजना आहे.
व्हीलचेअरही जाऊ शकतील
या बसेसचे दरवाजे व्हीलचेअर जाऊ शकतील इतके रुंद असणार असून ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन एएमटी सुविधा असणार्या असतील. त्याचा दिव्यांग प्रवाशांना आणि रुग्णांनाही फायदा होणार आहे. अशा नॉन एसी डिझेलवर धावणार्या 37 बसेससाठी टाटा मोटर्स लिमिटेडने यासाठी दिलेल्या निविदेला प्रतिसाद दिला आहे.



























































