
बेस्ट उपक्रमाचा संचित तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई महापालिकेने चालू वर्षासाठी केवळ 928.65 लाख रुपयांचे तुटपुंजे अनुदान मंजूर केले. त्यामुळे बेस्ट उपक्रमाची अवस्था गिरणी उद्योगासारखी होऊ शकते. संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि बेस्ट उपक्रम वाचवण्यासाठी बेस्ट कामगार सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. बेस्ट उपक्रम आणि कर्मचाऱयांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बेस्ट कामगार सेनेमार्फत शुक्रवारी दुपारी वडाळा आगारात तीव्र निदर्शने केली जाणार आहेत.
विधिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बेस्ट उपक्रमाला तत्काळ 5000 कोटी देण्याची तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱयांना ग्रॅच्युईटी तात्काळ प्रदान करण्याची मागणी केली. त्याच पार्श्वभूमीवर आता बेस्ट कामगार सेनेमार्फत निदर्शने केली जाणार आहेत. सेवानिवृत्त बेस्ट कामगारांची ग्रॅच्युईटी दिलीच पाहिजे, बेस्टचा स्वमालकीचा बस ताफा 3337 झाला पाहिजे, सर्व विभागातील कर्मचाऱयांची पदोन्नती तात्काळ सुरू करा, नवीन नोकरभरती सुरू करा, कामगारांची प्रलंबित थकबाकी प्रदान करा आदी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. शिवसेना आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे, महेश सावंत, माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात येणार आहेत. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, रंजन चौधरी, उदयकुमार आंबोणकर हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.