महायुती सरकारच्या काळात मराठी कामगारांची परवड; बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे बुधवारी आंदोलन, अंतिम देयके देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने संताप

‘मुंबईची दुसरी जीवनवाहिनी’ असलेल्या बेस्टच्या प्रशासनातून सेवानिवृत्त झालेल्या भूमिपुत्र मराठी कामगारांची महायुती सरकारच्या काळात प्रचंड परवड सुरू आहे. निवृत्तीनंतरच्या हक्काच्या अंतिम देयकांसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांनी वारंवार निवेदने दिली. त्यावर आश्वासने देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात नंतर सरकारने डोळ्यांत धूळफेकच केल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हक्काच्या लाभांची रक्कम मिळवण्यासाठी निवृत्त कर्मचारी बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून आझाद मैदानात ‘चड्डी बनियन’ आंदोलन करणार आहेत.

राज्यात भाजप महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांची परवड सुरू आहे. ऑगस्ट 2022 पासून निवृत्त कर्मचारी, अधिकाऱ्यांची हक्काची ग्रॅच्युईटी व इतर अंतिम देयके दिलेली नाहीत. या तीन वर्षांच्या कालावधीत हक्काची देणी मिळण्याच्या आशेवर जीवन जगत 100 ते 150 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. देणी न मिळाल्याने काही कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून ते ‘भीक मागो’ आंदोलन करीत आहेत. यासंदर्भात बेस्ट उपक्रमासह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली. त्यावर जुजबी उत्तरे देण्यापलीकडे सरकारकडून ठोस काहीच न घडल्याने निवृत्त कर्मचारी आंदोलन करणार आहेत.

कोरोना काळातील सेवेची कदर नाही!

बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मुंबईकरांची सेवा केली. इतकेच नव्हे तर 30-35 वर्षांच्या सेवा कालावधीत मुंबईतील दंगल, 2005 मधील अतिवृष्टी अशा भयंकर संकटांचा सामना केला. अशा भूमिपुत्र मराठी कामगारांना आपल्या हक्काच्या देणी मिळण्यासाठी ‘चड्डी बनियन’ आंदोलन करावे लागतेय ही सरकारसाठी शरमेची बाब आहे, अशी संतप्त भावना निवृत्त कर्मचारी व्यक्त करीत आहेत.