‘भद्रावती’वर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला

सामना ऑनलाईन, नागपूर

गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता असलेल्या विदर्भाच्या चंद्रपूर जिह्यातील भद्रावती नगर परिषदेवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेचे अनिल धानोरकर नगराध्यक्षपदी निवडून आल्याने भद्रावतीत शिवसेनेची पकड मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत जबरदस्त धक्का बसला आहे. शिवसेनेच्या या विजयानंतर शिवसैनिकांनी विजयी मिरवणूक काढून आंनदोत्सव साजरा केला.

भद्रावती येथे नगर परिषद स्थापन झाल्यापासून शिवसेनेचा नगराध्यक्ष राहिला आहे. शिवसेनेचे आमदार बाळू (सुरेश) धानोरकर पहिल्यांदा निवडून आले. यावेळी नगराध्यक्षपदासाठी आमदार धानोरकर यांनी आपल्या भावाला उमेदवारी दिली होती. आमदार धानोरकर यांनी केलेल्या विकासकामांमुळे अनिल धानोरकर निवडून आले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवी पाटील व आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली.

एकूण 27 सदस्यांच्या या नगरपालिकेत भाजपचे केवळ तीन सदस्य निवडून आले. काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. या दोन्ही राष्ट्रीय पक्षांपेक्षा भारिप-बहुजन महासंघाने चार जागा पटकावून आपले अस्तित्व दाखवून दिले. भद्रावती येथील विजयाबद्दल बोलताना आमदार बाळू धानोरकर म्हणाले, शिवसेनेने गेल्या 25 वर्षांपासून भद्रावतीकरांचा विश्वास संपादन केला आहे. विकासकामे केल्याने पुन्हा मतदारांनी शिवसेनेला भरघोस मतदान करून निवडून दिले आहे.

शिवसेनेचे अनिल धानोरकर यांनी भाजपच्या सुनील नामोजवार यांचा 4,616 मतांनी पराभव केला. एकूण 27 नगरसेवक असलेल्या नगर परिषदेत शिवसेनेने 16 जागा पटकावल्या. भाजप-4, काँग्रेस-2, भारिप बमस -4, अपक्ष-1 असे बलाबल जाहीर झाले आहे. थेट नगराध्यक्षपदाची जागा जिंकून शिवसेनेने इतिहास घडवला आहे.

या निवडणुकीत भाजप झेंडा फडकवेल असे बोलले जात होते. भाजपच्या चाणक्यां’नी ऐनवेळी शिवसेनेचे नेते व भद्रावतीचे पहिले नगराध्यक्ष किशोर नामोजवार यांना भाजपच्या तंबूत आणले; परंतु ऐनवेळी आलेल्या नामोजवार यांना शिवसेनेचा गड भेदता आला नाही. उलट शिवसैनिकांनी भाजपला चांगलाच हात दाखविला. त्यांचा 8 हजारपेक्षा अधिक मताधिक्यांनी पराभव झाला.