
मर्यादा पुरुषोत्तम आणि हिंदूंचे दैवत असलेल्या प्रभू रामचंद्रांवरील टपाल तिकिटांना देश-विदेशातून मोठी मागणी आहे. 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास झाल्यावर भगवान रामचंद्रांवरील पोस्टल तिकिटे विक्रीसाठी आणण्यात आली. गेल्या 5 दिवसांत नागरिकांनी प्रभू रामचंद्रांवरील आणि अयोध्येतील राममंदिराचे छायाचित्र असणारी 16 लाखांहून अधिक किमतीची पोस्टल तिकिटे खरेदी केली. विदेशातूनही हिंदुस्थानी नागरिकांकडून पोस्ट खात्याकडे या तिकिटांसाठी मोठी विचारणा होत आहे.
हिंदुस्थानी नागरिक आपल्या पुढच्या पिढीला आपल्या आदर्श आणि उदात्त संस्कृतीचे धडे मिळावेत यासाठी प्रभू रामचंद्रांवरील प्रत्येक बाबींची खरेदी करताना दिसत आहेत. अयोध्या आणि भगवान रामचंद्रांवरील टपाल तिकिटांच्या खरेदीसाठीही नागरिकांची मोठी गर्दी देशभरातील पोस्ट कार्यालयांत होत आहे. नव्या टपाल तिकीटांवर अयोध्येतील राममंदिर आणि भगवान रामाच्या चरित्रावर आधारित छायाचित्रांचा समावेश आहे. आपल्या लाडक्या दैवताचे चरित्र असणारी टपाल तिकिटे आपल्या संग्रहात ठेवण्यासाठी हिंदुस्थानी नागरिक उत्सुक असल्याचे चित्र या तिकिटांच्या मोठय़ा खरेदीतून दिसून आले आहे.
एकटय़ा अयोध्या शोध संस्थानने खरेही केली 12 लाखांची तिकिटे
प्रभू रामचंद्रांवरील टपाल तिकीट मालिकेच्या 60 हजार शीटस् पोस्ट खात्याने विक्रीसाठी आणल्या आहेत. त्यातील 5 हजार शीटस् एकटय़ा अयोध्या शोध संस्थानने खरेदी केल्या.या खरेदीसाठी संस्थानने 12 लाख रुपये पोस्ट खात्याच्या लखनौ विभागाला दिले आहेत. शिवाय नागरिकांनी 500 तिकिटे लखनौतील विविध टपाल कार्यालयातून खरेदी केल्याची माहिती लखनौ पोस्टल विभागाचे निदेशक के.के. यादव यांनी दिली.
12 तिकिटांच्या शीटची किंमत 300 रुपये
रामभक्तांना प्रभू रामचंद्रांकरील 12 तिकिटांच्या एक शीटसाठी 300 रुपये मोजाके लागणार आहेत. यातील प्रत्येक स्टॅम्प 25 रुपये मूल्याचा आहे. व्यावसायिक माय स्टॅम्प योजनेत विक्री करण्यासाठी पोस्टाने 5 हजार शीटस्ची छपाई केली आहे. आतापर्यंत त्यातील 5500 टपाल तिकिटांची विक्री झाली आहे. ही तिकिटे धार्मिक आस्थेचा विषय असल्याने देश -विदेशातून तिकिटांना मोठी मागणी आहे, अशी माहिती पोस्टल निदेशक के.के. यादव यांनी दिली.























































